विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या सिनेमात अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे या अभिनेत्यांनी ‘छावा’मध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘छावा’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये संतोष जुवेकरचा सिनेमातला पहिला लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. संतोषने या चित्रपटात ‘राया’ ही भूमिका साकारली आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच तो बॉलीवूड स्टार विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

संतोष जुवेकरने याआधीच ‘छावा’ कादंबरी वाचल्याने या सिनेमाशी तो भावनिकरित्या जोडला गेला होता. त्यामुळे चित्रपटातले अनेक सीन्स करताना भावुक झाल्याचं अभिनेत्याने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. विशेषत: ‘राया’च्या भूमिकेत शेवटचा सीन शूट करताना मनात काय भावना होती याचा अनुभव संतोषने यावेळी सांगितला आहे.

संतोष जुवेकर म्हणाला, “छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वराला जेव्हा कैद करण्यात आलं. त्यानंतर अनेक लढाया झाल्या. पुढे, सर्वात आधी हंबीरराव गेले… यादरम्यान महाराजांसाठी अनेकांनी लढा दिला. रायाजीचा एक शेवटचा सीन आम्ही पाण्यात शूट करत होतो… आताच मी सगळं सांगणार नाही पण, रायाजीची भूमिका त्या सीननंतर संपणार होती. त्यावेळी मनात एक विचार पटकन आला तो म्हणजे, ‘अरे…आता आपले राजे एकटे आहेत’ आताही तो प्रसंग सांगताना मला भरून येतंय. मी खूपच कनेक्टेड आहे या सिनेमाशी… आताही मी हे सांगताना भावनिक होतोय आणि माझ्याप्रमाणे सगळेजण याच्याशी कनेक्ट होतील. त्यानंतरचा जो शेवटचा सीन आहे, तो सरांनी आम्हाला अजून दाखवलेला नाहीये. मी तो सीन पाहू शकेन की नाही मला खरंच माहिती नाही. कारण, महाराजांबरोबर शेवटी जे झालं…ते कादंबरीत वाचून सुद्धा डोळे पाणावतात. त्यांनी आपल्यासाठी काय केलंय याची जाणीव सर्वांना झाली पाहिजे. हा संपूर्ण सिनेमा माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे.”

दरम्यान, ‘छावा’द्वारे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. यामध्ये विकी कौशल प्रमुख भूमिकेत झळकेल. तर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. सिनेमात औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना साकारणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhaava movie santosh juvekar talks about last scene of movie and become emotional sva 00