Chhaava Movie : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली आहे. १४ फेब्रुवारीला ‘छावा’ संपूर्ण जगभरात प्रदर्शित करण्यात आला. हा सिनेमा पाहून प्रेक्षक चांगलेच भारावून गेले आहेत. यामध्ये विकी कौशलसह अनेक मराठी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. संतोष जुवेकर, आशिष पाथोडे, शुभंकर एकबोटे असे सगळेच कलाकार चित्रपटात शेवटच्या सीनपर्यंत लक्ष वेधून घेतात. मात्र, यांच्याबरोबर आणखी दोन अभिनेत्यांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे आणि ते दोघं म्हणजे सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये… यांच्या भूमिकांबद्दल जाणून घेऊयात…

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याकडून संगमेश्वर येथे कैद केलं जातं असा अंगावर शहारा आणणारा सीन प्रेक्षकांना ‘छावा’मध्ये पाहायला मिळतो. आंबाघाटाच्या मार्गाने औरंगजेबाच्या सैन्याला रात्रीच्या अंधारात वाट दाखवली जाते आणि त्याचं ५ हजारांचं सैन्य महाराजांना कैद करण्यासाठी चालून येतं असतं. यावेळी आंबाघाटाचा कठीण मार्ग मुघलांना कसा सापडला ही शंका संताजीच्या मनात निर्माण होते आणि यातूनच फितुरी झाल्याचं उघड होतं.

महाराजांकडे केवळ १५० मावळे असतात. तर, दुसरीकडे औरंगजेब महाराजांना कैद करण्यासाठी तब्बल ५ हजारांचं सैन्य पाठवतो. या लढाईत अंताजी, रायाजी असे सगळेजण आपले प्राण गमावतात. शेवटी कान्होजी आणि गणोजी शिर्के यांनी केलेल्या फितुरीमुळे शंभूराजेंना कैद करणं औरंगजेबाच्या सैन्याला शक्य होतं असा संपूर्ण प्रसंग ‘छावा’ सिनेमामध्ये पाहायला मिळतो. गणोजी शिर्के हे महाराणी येसूबाईंचे बंधू व छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे होते. याच गणोजींची भूमिका चित्रपटात सारंग साठ्ये साकारत आहे. तर, कान्होजींच्या भूमिकेत सुव्रत जोशी झळकत आहे. यामुळेच चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या दोघांचीही सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.

Chhaava Movie
Chhaava Movie
Chhaava Movie
Chhaava Movie

सुव्रत जोशीने चित्रपटाबद्दलचे अनेक रिव्ह्यूज त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. यातल्या एका रिव्ह्यूमध्ये “सुव्रत आणि सारंग यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली” असं लिहिण्यात आलं आहे. यावरून दोघांनाही त्यांनी साकारलेल्या भूमिकांची पोचपावती मिळालेली आहे. सारंग आणि सुव्रत यांच्या भूमिका शेवटपर्यंत ‘छावा’मध्ये मोठा सस्पेन्स निर्माण करतात. औरंगजेबाला जाऊन नेमकं कोण मिळालंय, हे सिनेमात गुप्त ठेवलेलं आहे. शेवटी जेव्हा या दोघांचे चेहरे उघड होतात, तेव्हा आपल्याच माणसांनी फितुरी केल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दाटून येते. यामुळे सध्या सुव्रत आणि सारंग यांनी साकारलेल्या भूमिकांची सर्वत्र चर्चा होत आहे.

Story img Loader