Chhaava Movie : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात बॉलीवूड अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिका साकारत आहे. तर, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘छावा’मध्ये महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकतेय. सध्या मनोरंजन विश्वात या सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. अनेक ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरू आहेत. याचदरम्यान अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी या सिनेमासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
‘छावा’ सिनेमा अहिल्यानगर येथील प्रत्येक सर्वसामान्य महिलेला पाहता यावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी चित्रपटाचे काही शोज मोफत आयोजित केले आहेत. याबद्दल माहिती देताना संग्राम जगताप म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासातून महिला भगिनींना प्रेरणा मिळावी यासाठी अहिल्यानगर मधील महिलांसाठी बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटाचे मोफत शोज आयोजित केले आहेत. तरी सर्व महिला भगिनींनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नक्की अनुभवावा.”
“छावा सिनेमाचे शो १७ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार कॉनप्लेक्स थिएटर, कोहिनूर मॉल येथे ( दुपारी ४:३० वाजता) आणि सिनेलाइफ थिएटर, नगर कॉलेज जवळ, जुडीओच्या वरती अहिल्यानगर येथे ( दुपारी ३:३० वाजता) आयोजित करण्यात आले आहेत.” अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे.
दरम्यान, ‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, या सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेत तब्बल १२१ कोटींचा गल्ला जमावला आहे. या सिनेमात विकी-रश्मिकासह अक्षय खन्ना, आशुतोष राणा, डायना पेंटी, विनीत सिंह, संतोष जुवेकर, नीलकांती पाटेकर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ‘छावा’ सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.