Chhaava Movie : ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरातील सिनेप्रेमींना छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. यामध्ये विकी कौशल, रश्मिका, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार देखील झळकले आहेत. संतोष जुवेकर, आशिष पाथोडे, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, नीलकांती पाटेकर या सगळ्या कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तमप्रकारे साकारल्या आहेत.
‘छावा’मध्ये आणखी एक मराठमोळा अभिनेता झळकला आहे. या अभिनेत्याने भलीमोठी पोस्ट शेअर करत चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच विकी कौशलबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. या अभिनेत्याचं नाव आहे शुभंकर एकबोटे. दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं नाव मराठी कलाविश्वात अतिशय सन्मानाने घेतलं जातं. शुभंकर हा अश्विनी एकबोटेंचा लेक आहे. शुभंकरने आईच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्याने ‘छावा’मध्ये त्याने सरसेनापती धनाजी जाधव यांची भूमिका साकारली आहे. या संपूर्ण प्रवासाबद्दल शुभंकरने काय लिहिलंय पाहूयात…
शुभंकर एकबोटे लिहितो, “सेटपासून मोठ्या पडद्यापर्यंत – ‘छावा’ जगभरात आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहे! या संपूर्ण प्रवासाचा मला एक भाग होता आलं याचा मला प्रचंड अभिमान आहे. या संपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक क्षणाला अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल लक्ष्मण उतेकर सर तुमचे खूप खूप आभार…”
“२०१४ मध्ये मी ‘मसान’ पाहिला होता तेव्हापासून प्रतिभाशाली आणि पॉवर हाऊस असलेल्या विकी कौशलबरोबर काम करण्याची संधी मिळावी यासाठी मॅनिफेस्ट केलं होतं आणि ती इच्छा या निमित्ताने पूर्ण झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकी कौशल ‘आमचे राजे…’ माणूस म्हणूनही तो तेवढाच चांगला आहे. राजे तुमच्याबरोबर काम केल्याचा हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. मानाचा मुजरा राजे…आणि मला तुमच्याबरोबर पुन्हा-पुन्हा स्क्रीन शेअर करायला कायमच आवडेल. ज्येष्ठ अभिनेते आशुतोष राणा सर, प्रदीप सर, विनीत भाई, संतोष दादा ज्यांना मी लहानपणापासून पडद्यावर पाहत आलो…त्यांच्याबरोबर आयुष्यभराचे अविस्मरणीय क्षण शेअर करण्याची संधी मिळाली याबद्दल मी त्यांचे पुरेसे आभार देखील मानू शकत नाही. भार्गव शेलार सर आणि परवेज शेख सरांच्या संपूर्ण टीमने मला पडद्यावर लढण्यास सक्षम बनवलं यासाठी त्यांचे मनापासून आभार…माझे मित्र अंकित, आशिष, बालाजी सर, सारंग भाऊ, सुव्रत अशा चांगल्या लोकांचा सहवास या शूटिंगदरम्यान लाभला यासाठी मी आभारी आहे. दिनेश विजन सर, मॅडडॉक फिल्म्स आणि संपूर्ण छावा टीमचे मनापासून आभार…या टीमचा भाग होऊन मी धन्य झालो…’छावा’मध्ये ‘सरसेनापती धनाजी जाधव’ यांची भूमिका साकारण्याची मला संधी दिली हे माझं भाग्यच आहे. मराठ्यांची गर्जना अनुभवण्यासाठी आणि आपल्या महाराजांच्या बलिदानाची, त्यांच्या अविस्मरणीय धाडसाची कहाणी पाहण्यासाठी कृपया चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पाहा…हर हर महादेव!” अशी पोस्ट लिहित शुभंकरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, शुभंकरच्या पोस्टवर अविनाश नारकर, आशय कुलकर्णी, शाल्व किंजवडेकर, अभिषेक राहळकर, चेतन गुरव या सगळ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.