Chhaava Movie : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. १४ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दिवशीच ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली. यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल सुरू होते. गेल्या काही दिवसांत विकी कौशलसह चित्रपटातील सगळ्याच कलाकारांवर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘छावा’मध्ये अनेक मराठी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याकडून कैद केलं जातं असा अंगावर शहारा आणणारा सीन प्रेक्षकांना ‘छावा’मध्ये पाहायला मिळतो. यावेळी आंबाघाटाचा कठीण मार्ग मुघलांना कसा सापडला ही शंका संताजीच्या मनात निर्माण होते आणि यातूनच पुढे फितुरी झाल्याचं उघड होतं.

गणोजी आणि कान्होजी यांच्या भूमिका सिनेमात अनुक्रमे सारंग साठ्ये व सुव्रत जोशी यांनी साकारल्या आहेत. यामुळे सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून हे दोघंही त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे चर्चेत होते.

‘छावा’ प्रदर्शित झाल्यावर सुव्रत परदेशात होता. आता भारतात आल्यावर अभिनेत्याने त्याची पत्नी अभिनेत्री सखी गोखलेबरोबर हा सिनेमा पाहिला. चित्रपट पाहिल्यावर सखीने सुव्रतसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

“सिनेमात तुमचं काम एवढं व्यवस्थित करा की तुमची बायको द्विधा मनस्थितीत सापडली पाहिजे… तू इतकं छान काम केलं आहेस म्हणून तुझं कौतुक करू की तुझी भूमिका पाहून तुझा द्वेष करू? याच विचारात मी पडले आहे…सुव्रत कलाकार म्हणून तुझा खूप खूप अभिमान वाटतो.” असं सखीने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टबरोबर सखीने सुव्रतने ‘छावा’मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेचे फोटो देखील शेअर केले आहेत. मात्र, या कोलाजमध्ये एक फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतो. या फोटोत सुव्रतने ‘छावा’च्या पोस्टरच्या बाजूला उभा राहून कान धरल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री सखी गोखलेची पती सुव्रत जोशीसाठी पोस्ट, ‘छावा’ सिनेमातील अभिनयाचं केलं कौतुक ( Chhaava Movie )

दरम्यान, ‘छावा’ सिनेमाने गेल्या ११ दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर सिनेमाने तब्बल ४१७.२० कोटी कमावले आहेत. विकी कौशलच्या आजवरच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे.