Chhaava Trailer : “हम शोर नही करते, सिधा शिकार करते हैं…”, असे एकापेक्षा एक भारदस्त संवाद, मराठा साम्राज्य, छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा अशा सगळ्या गोष्टी ‘छावा’ चित्रपटाच्या ३ मिनिटं ८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘छावा’ चित्रपटाबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर टीझर, पोस्टरनंतर ‘छावा’ सिनेमाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकी कौशलने ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं. यानंतर ‘छावा’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारणं ही विकीसाठी मोठी गोष्ट होती. या भूमिकेसाठी त्याने दिवसरात्र मेहनत घेतली होती. याची झलक ट्रेलरमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतेय. हा जवळपास ३ मिनिटांचा ट्रेलर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

मराठा साम्राज्याची भव्यता, छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेला लढा याशिवाय “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा!”, “जय भवानी”, “मौत के घुंघुरु पहन कें नाचते हैं हम औरंग”, “छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते है, और शेर के बच्चे को छावा” असे अनेक अंगावर शहारा आणणारे संवाद ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतात. या सिनेमात रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. लढाई करताना विकीचा रुद्रावतार पाहायला मिळतो. चहुबाजूंनी ‘हर हर महादेव’च्या शिवगर्जना सुरू होतात. सिनेमाच्या ट्रेलरमधली अनेक दृश्य पाहताना अंगावर काटा येतो.

एकीकडे महाराजांचा पराक्रम, शौर्यगाथा पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे औरंगजेब महाराजांना रोखण्यासाठी योजना आखत असल्याचं पाहायला मिळत आहे. बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात विकीसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अनेक संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. तर, ‘छावा’मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसेल.

दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जरा हटके जरा बचके’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटानंतर विकी आणि लक्ष्मण उतेकर यांचा हा एकत्रित दुसरा चित्रपट आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhaava movie trailer out now starring vicky kaushal rashmika mandanna watch sva 00