Chhaava Movie : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची गेल्या महिन्याभरापासून सर्वत्र चर्चा चालू आहे. प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दिवशीच ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली होती. याशिवाय गेल्या महिन्याभरात ‘छावा’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल ५०० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. विकी कौशलच्या अभिनयाचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. याशिवाय यामध्ये भूमिका साकारणाऱ्या मराठी कलाकारांवर देखील प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
‘छावा’मध्ये अनेक मराठी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याकडून कैद केलं जातं असा अंगावर शहारा आणणारा सीन प्रेक्षकांना ‘छावा’मध्ये पाहायला मिळतो. यावेळी आंबाघाटाचा कठीण मार्ग मुघलांना कसा सापडला ही शंका संताजीच्या मनात निर्माण होते आणि यातूनच पुढे फितुरी झाल्याचं उघड होतं.
गणोजी आणि कान्होजी यांच्या भूमिका सिनेमात अनुक्रमे सारंग साठ्ये व सुव्रत जोशी यांनी साकारल्या आहेत. यामुळे सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून हे दोघंही त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांमुळे चर्चेत होते. या सिनेमाच्या प्रीमियरला सुव्रत गैरहजर होता. याचं कारण अभिनेत्याने नुकत्याच ‘लोकशाही फ्रेंडली’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
सुव्रत जोशी म्हणाला, “माझ्या अनेक अमराठी मित्रमैत्रिणींनी हा चित्रपट खूप प्रेमाने पाहिला. केवळ यात माझी भूमिका आहे म्हणून नाही पण, सगळ्यांनीच या चित्रपटाचं कौतुक केलं. जगभरातून अनेक लोकांनी मला मेसेज केले. मला मेसेजवर विचारलं सुद्धा ‘तू प्रीमियर शोला वगैरे का गेला नाहीस?’ पण, तेव्हा मी अॅमस्टरडॅमला होतो. दहा दिवसांचा तो दौरा होता. तेथील नाटकाच्या महोत्सवात प्रमुख पाहुणा म्हणून मी उपस्थित होतो. चित्रपट सुद्धा तेव्हाच प्रदर्शित झाला. मला जवळपास ६०-७० मेसेज येत होते. अनेक मेसेज असेही होते की, आम्हाला तुझी चिड आली, राग आला…तुला अशा भूमिकेत आम्ही कधी बघितलं नव्हतं. भावनेच्या भरात अनेकांनी शिव्याही दिल्या. पण, मी ते खूप सकारात्मकतेने घेतलं.”
“प्रेक्षकांना एखाद्या नकारात्मक पात्राची चिड येणं अभिप्रेत असतं कारण, ते माझं काम आहे. मी दोन पात्रांसाठी ऑडिशन दिली होती आणि त्यानंतर ही भूमिका माझ्याकडे आली होती. मला विषय, भूमिका सर्व आधीच सांगण्यात आलं होतं. मी हिंदीत काम करण्याआधी सगळ्या भूमिकांसाठी ऑडिशन दिलेल्या आहेत. आताही तसंच झालं…’छावा’साठी मी ऑडिशनची सगळी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर या भूमिकेसाठी माझी निवड झाली होती.” असं सुव्रतने यावेळी सांगितलं.