Chhaava Movie Aaya Re Toofan Song : देशभरात सध्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यावर लेझीम दृश्यांमुळे काहीसा वाद उद्भवला होता. पण, दिग्दर्शकांनी वेळीच तो सीन डिलिट होईल असं सांगत या वादावर पडदा टाकला. यानंतर संपूर्ण टीम आणखी सक्रिय होऊन ‘छावा’चं जोरदार प्रमोशन करताना दिसतेय. विकीने नुकतंच छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग शिव मंदिरात दर्शन घेतलं आहे. यानंतर या सिनेमाचं एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आया रे तुफान’ या गाण्याची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या गाण्याने सोशल मीडियावर खरोखरीच ‘तुफान’ आणल्याचं पाहायला मिळत आहे. ए आर रेहमान यांचं संगीत, त्यांचा आवाज आणि सोबतीला मराठमोळी गायिका वैशाली सामंतने दिलेली साथ यामुळे हे गाणं प्रेक्षकांसाठी एक अनोखी म्युझिकल ट्रिट ठरलं आहे. राज्याभिषेक सोहळ्याचा सीन सुरू होताच वैशालीचा आवाज कानांना मंत्रमुग्ध करतो. छत्रपती शंभूराजेंना आलेली आबासाहेबांची आठवण, महाराणी येसूबाईंची साथ या गोष्टी मनाला भावुक करून जातात.

‘आया रे तुफान’ या गाण्यात महाराज मुघलांच्या सैन्याशी लढा देत असल्याचं पाहायला मिळतं. यामधले व्हिएफएक्स इफेक्ट विशेष लक्ष वेधून घेतात. याशिवाय खरा अंगावर काटा येतो ते २ मिनिटं ४ सेकंदाला असलेलं दृश्य पाहून…या सीनमध्ये महाराज कोणत्याही शस्त्राविना सिंहाचा जबडा फाडताना दिसत आहे.

या गाण्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस पाडण्यात येत आहे. “२ मिनिटं ४ सेकंदाला असलेला सीन पाहून अंगावर काटा येतो हा सिनेमा ब्लॉकबस्टर होणार”, “ए आर रेहमानचा आवाज वाह वाह सुरेख”, “धर्मरक्षक आपले महाराज”, “सिंहाचा सीन जबरदस्त आहे” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, बहुप्रतीक्षित ‘छावा’ सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय या सिनेमात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत.