लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा'(Chhaava) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महिनाभरानंतरही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाने ७०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयु्ष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसले होते. प्रेक्षक हा चित्रपट पाहिल्यानंतर भावूकदेखील झाले होते. आता ‘छावा’ चित्रपटाचे संसदेत स्क्रिनिंग होणार आहे.
‘छावा’ चित्रपटाचे संसदेत स्क्रिनिंग कधी होणार?
न्यूज १८ नुसार, २७ मार्चला संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये बालयोगी ऑडिटोरियममध्ये ‘छावा’ चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, खासदार या शोला हजर राहू शकतात. विशेष बाब म्हणजे, चित्रपटाची संपूर्ण टीमदेखील या संसदेतील स्क्रिनिंगला हजर राहणार आहे, त्यामुळे विकी कौशलदेखील संसदेतील या स्पेशल स्क्रिनिंगसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधीदेखील ‘छावा’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केलेल्या भाषणात त्यांनी छावा चित्रपट धुमाकूळ घालत असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर अभिनेता विकी कौशलने त्यांचे आभार मानले होते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करीत कृतज्ञ असल्याचे म्हटले होते. तसेच अभिनेत्री रश्मिका मंदानानेदेखील हा खरा सन्मान असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते.
‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. विकी कौशलचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. महाराणी येसूबाईंची भूमिका ही लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे, तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. सर्वच कलाकारांचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक कंपनीने केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वादही निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचे तर तो लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर व आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत, तर रश्मिका मंदाना ‘सिकंदर’ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे.