Chhaava Trailer Controversy : विकी कौशल व रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षीत ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर आल्यानंतर ‘छावा’ सिनेमा वादात अडकला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवले आहेत, यावरून वाद सुरू झाला आहे. या सीनसंदर्भात उदयनराजे भोसले यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला फोन केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘छावा’ सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारीला रिलीज करण्यात आला. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या नृत्याच्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. काही संघटनांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही सिनेमाच्या माध्यमातून महाराजांचा इतिहास जगभरात जाणार आहे. पण त्यांनी ट्रेलरमध्ये महाराज नृत्य करताना दाखविल्यामुळे ते लोकांना कितपट पटेल, याबाबत शंका वाटते; असं म्हटलं होतं. याचदरम्यान आता उदयनराजे भोसले यांनी थेट उतेकर यांना फोन लावला.

उदयनराजे काय म्हणाले?

उदयनराजे फोनवर म्हणाले, “तुम्ही चित्रपटाचं दिग्दर्शन खूप सुंदर केलं आहे. त्यातले एखाद दुसरे दृश्य जे आहे ते आपण इतिहासतज्ज्ञांना विचारात घेऊन केलं, तर आता कारण नसताना जी कॉन्ट्रोव्हर्सी होतेय ती संपेल.” यावर लक्ष्मण उतेकर उत्तर देत म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे किती थोर होते, हेच दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे तज्ज्ञांना दाखवून जे काही बदल करायचे आहेत, ते आपण नक्की करू.”

चित्रपटात जर काही आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली असतील तर ती बदलून लोकांपर्यंत चांगला चित्रपट लवकरात लवकर पोहोचावा. आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी, धर्मासाठी केलेले योगदान हे चांगल्या पद्धतीने जगाच्या समोर यावे, अशी सूचना उदयनराजे यांनी लक्ष्मण उतेकर यांना दिली. उतेकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत चित्रपटात तज्ज्ञांशी बोलून बदल करण्याची ग्वाही दिली.

उदय सामंत यांची भूमिका

मंत्री उदय सामंत यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं, “धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे.”

उदय सामंत यांची पोस्ट (सौजन्य – एक्स)

“महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!” असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhaava trailer controversy udayanraje bhosale calls chhava director laxman utekar to make changes in movie hrc