Chhaava Trailer Out Now Netizens Reaction : विकी कौशल प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘छावा’ चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते. काही महिन्यांपूर्वी टीझरमधून ‘छावा’ सिनेमाची लहानशी झलक सर्वांना पाहायला मिळाली होती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर लाँचसाठी विकी स्वत: उपस्थित होता. यापूर्वी त्याने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन सुद्धा घेतलं.
ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ‘छावा’ चित्रपटाबद्दल एक वेगळीच सकारात्मक लाट तयार झालेली आहे. अवघ्या काही तासांत ‘छावा’च्या ट्रेलरने रेकॉर्ड ब्रेकिंग व्ह्यूज मिळवले आहेत. याशिवाय ट्रेलरवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पाडण्यात आला आहे.
विकी कौशलचा रुद्रावतार या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अहोरात्र मेहनत घेतल्याचं विकीने यापूर्वीच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच विकीच्या चाहत्यांसह मराठी कलाकारांनी सुद्धा खास पोस्ट शेअर करत या सिनेमासाठी टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
‘छावा’च्या ३ मिनिटं ८ सेकंदाच्या ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी, “अंगावर शहारे आणणारे प्रसंग आहेत”, “विकी कौशल या भूमिकेसाठी पूर्णपणे ट्रान्सफॉर्म झाला आहे”, “१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे नसेल, यंदा छावा डे असेल”, “सर्वोत्कृष्ट अभिनेता, राष्ट्रीय पुरस्कार… विकीला यंदा सगळे अवॉर्ड्स नक्की मिळणार”, “शूर आबांचा शूर छावा… छत्रपती संभाजी महाराज…”, “छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो”, “हा सिनेमा ब्लॉकबस्टकर होणार”, ‘छावा’ची १००० कोटींहून अधिक कमाई नक्की होईल” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

याशिवाय शुभंकर एकबोटेने स्टोरी शेअर करत “आग लावणार ट्रेलर”, संतोष जुवेकर, वैभव चव्हाण, अश्विनी मुकादम यांसारख्या अनेक कलाकारांनी या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ‘छावा’ चित्रपटात विकी कौशलसह अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. अक्षय खन्ना यामध्ये औरंगजेबाची भूमिका साकारेल, येत्या १४ फेब्रुवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.