‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा प्रवास, त्यांनी लढलेल्या लढाया व त्यांना औरंगजेबाने दिलेला त्रास या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाचा क्लायमॅक्स सुरू असताना काही जण विनोद करून हसले, त्यांना उपस्थितांनी माफी मागायला लावली.

नवी मुंबईतील एका थिएटरमध्ये ‘छावा’ चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनदरम्यान हसल्याबद्दल आणि विनोद केल्याबद्दल पाच जणांना माफी मागायला लावण्यात आली, यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोपर खैरणे परिसरातील बालाजी मूव्हीप्लेक्स चित्रपटगृहात ही घटना घडली.

मुघल सम्राट औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला होता, तो छावामधील क्लायमॅक्स पाहून हे लोक हसले असा आरोप त्यांच्यावर आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, जे पाच जण या दृश्यावर हसले आणि विनोद केले, त्यांना काही जणांनी गुडघे टेकून माफी मागायला लावली. तसेच त्यांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करायला लावला.

पाच जणांपैकी एक जण “मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मांगतो” असे म्हणताना दिसला, मात्र लोकांनी त्याला छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागण्यास सांगितलं.

पाहा व्हिडीओ –

त्यानंतर त्याने हिंदीत माफी मागितली आणि म्हटलं की, “छत्रपती संभाजी महाराजांचा हा चित्रपट चालू असताना आम्ही हसत होतो”. नंतर ही आमची कर्मभूमी आहे, असंही तो म्हणतो. माफी मागायला लावल्यानंतर त्यांना उपस्थितांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं, असं हा व्हिडीओ शेअर करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने साकारली आहे. तर, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत व अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, निलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, डाएना पेंटी, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी या कलाकारांनी काम केलं आहे.

Story img Loader