अभिनेत्री छाया कदम यांच्यासाठी २०२४ हे वर्ष खूप खास ठरले आहे. त्यांच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या सिनेमाला कान महोत्सवात ‘ग्रँड प्रिक्स’ हा पुरस्कार मिळाला. तसेच, त्यांच्या ‘मडगाव एक्स्प्रेस’मधील कंचन कोंबडी या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आता त्यांचा ‘लापता लेडीज’ हा सिनेमा भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आला आहे. यावर छाया कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
छाया कदम यांचे ‘लापता लेडीज’ आणि ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हे दोन्ही सिनेमे भारताकडून ऑस्करला पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य यादीत होते, यापैकी ‘लापता लेडीज’ची भारताकडून निवड झाली. छाया कदम यांनी दोन्ही सिनेमांच्या बाबतीत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘लापता लेडीज’बाबत छाया कदम म्हणाल्या, “हा सिनेमा भारताकडून ऑस्करसाठी पाठवला जाणार आहे, हे ऐकून मी खूप आनंदी आहे. आमचा ‘लापता लेडीज’ हा सिनेमा भारताकडून अधिकृतपणे ऑस्करला पाठवला गेला आहे, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. माझा दुसरा सिनेमा ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हा फ्रान्सकडून ऑस्करला पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य यादीत आहे. याच सिनेमाच्या प्रीमियरसाठी मी पॅरिसमध्ये आहे.”
“मी आनंदी आहे, पण…”
छाया कदम यांची भूमिका असलेले ‘लापता लेडीज’ आणि ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हे दोन्ही सिनेमे भारताकडून ऑस्करसाठी निवड होणाऱ्या संभाव्य यादीत होते. ‘लापता लेडीज’ची निवड झाली यामुळे मी आनंदी आहे, पण त्याच वेळी मला पायल कपाडियाच्या ‘ऑल वी इमॅजिन लाइट’ या सिनेमासाठी जरा वाईट वाटते. हा निर्णय देशातील एका मोठ्या फिल्म फेडरेशनने घेतला आहे, त्यामुळे यावर माझं काहीच म्हणणं नाही. मला हे दोन्ही सिनेमे ऑस्करमध्ये पाहायला आवडले असते,” असं त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा…१.६ कोटींची कमाई करणारा ‘हा’ होता बॉलीवूडचा पहिला सुपरहिट सिनेमा, तुम्ही पाहिलाय का?
मंजू माईची भूमिका
छाया कदम यांनी त्यांच्या ‘लापता लेडीज’मधील मंजू माई या भूमिकेवर आणि तिला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रेमावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “लोक मला सांगतात की मंजू माई या भूमिकेने त्यांना प्रेरणा दिली. एक व्यक्ती म्हणूनसुद्धा मला या भूमिकेने खूप काही शिकवलं. मंजू हे असे पात्र आहे जे पडद्यावर कमी वेळ दिसते, पण त्याचा प्रभाव फार मोठा आहे.”
किरण रावला फोन करून मराठीत सांगितलं की…
छाया कदम म्हणाल्या की, “मी काल किरण रावला (‘लापता लेडीज’ दिग्दर्शक) अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. मला कोणी तरी ही माहिती दिली होती की, ‘लापता लेडीज’ची भारताकडून ऑस्करसाठी निवड झाली आहे. पण, किरण म्हणाली की अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. यानंतर फोन कट झाला. नंतर किरणचा मेसेज आला आणि तिने पुन्हा तेच सांगितलं की अजूनही ही अधिकृत घोषणा झाली नाही. मी तिला मराठीत सांगितलं की, आपला सिनेमा ऑस्करला नक्की जाईल. जेव्हा ही बातमी आली, तेव्हा मला खूप आनंद झाला.”