बॉलीवूडचीआघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या नव्या सिनेमाच्या यशामुळे चर्चेत आहे. अशातच आता तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकतीच ‘छिछोरे’ या सिनेमाला पाच वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त तिनं सिनेमाच्या सेटवरची काही क्षणचित्रं या व्हिडीओमधून पोस्ट केली आहेत. या व्हिडीओमध्ये सिनेमाच्या संपूर्ण टंमबरोबर केलेली मजामस्ती, तसेच सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो श्रद्धानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.

काय म्हणाली श्रद्धा ?
या व्हिडीओमध्ये सिनेमाचे दिग्दर्शक नितीश तिवारी, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, सुशांत सिंह राजपूत, ताहीर बासीन, तुषार पांडे आणि इतर अन्य कलाकारांचे फोटो आहेत. तसेच सिनेमाच्या ऑफ कॅमेरा काम करणाऱ्या टीमचे सदस्यदेखील यात पाहायला मिळत आहेत. श्रद्धानं हा व्हिडीओ पोस्ट करीत, ‘वो दिन भी क्या दिन थे’, अशी कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. सिनेमाच्या शूटिंगपासून ते सक्सेस पार्टीपर्यंतच्या सगळ्या आठवणींना श्रद्धानं पुन्हा एकदा नव्यानं उजाळा दिला आहे.

श्रद्धाच्या या व्हिडीओवर कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केला आहे. ‘छिछोरे’ सिनेमाला आज पाच वर्षं पूर्ण झाली, हे सगळंं पाहायला आज सुशांत या जगात असायला पाहिजे होता, अशा आशयाच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर या सिनेमातील कलाकारांचंदेखील चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे.

हेही वाचा – Video : आई-बाबा होण्याआधी रणवीर-दीपिकाने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; पारंपरिक अंदाजाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

२०१९ मध्ये नितीश तिवारी यांनी श्रद्धा कपूर, ताहीर बासीन, वरुण शर्मा, तुषार पांडे, प्रतीक बब्बर आणि दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत, तसेच अन्य कलाकार मंडळींना घेऊन हा सिनेमा दिग्दर्शित केला. या सिनेमाला प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवरदेखील चांगलीच पसंती दिली होती. सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर यांनी सिनेमात पहिल्यांदाच एकत्र येत काम केलं होतं. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं होतं.

हेही वाचा – कंगना रणौत यांनी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; म्हणाल्या, “सेन्सॉर बोर्डाच्या…”

कॉलेजच्या हॉस्टेलवर मित्रांबरोबर केलेली धमाल मजा-मस्ती ही प्रत्येकासाठी कायम खास असते. या सिनेमातील कॉलेजच्या हॉस्टेलवरचं विश्व आणि त्याचबरोबर कठीण काळात आयुष्याला कसं सामोरं जावं? आलेल्या संकटांसमोर हार न मानता हिमतीनं सामना करावा या सगळ्या गंभीर विषयाची दिग्दर्शकानं केलेली मांडणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आज या सिनेमाला पाच वर्षं लोटूनही चाहत्यांकडून तेवढंच प्रेम मिळत आहे.