करोनाच्या संकटानंतर चित्रपटगृहे पुन्हा चालू झाली. पण त्याचा फायदा बॉलिवूडला झाला नाही, कारण चित्रपटगृहे चालू झाल्यापासून बॉलिवूडला सोशल मीडियावर बॉयकॉटचा सामना करावा लागतोय. २०२२ या वर्षात चित्रपटांचा आढावा घेतल्यास बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्या चित्रपटांनी खूप चांगली कामगिरी केली. या वर्षी बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपट भरमसाठ कमाई करत असताना बॉलिवूड मात्र मोठ्या हिट चित्रपटांसाठी धडपडत आहे. यंदा बॉयकॉटचा सर्वात मोठा फटका आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाला बसला होता.
‘सूर्यवंशी’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘भूल भुलैया २’, ‘दृश्यम २’ असे काही मोजकेच चित्रपट वगळले असता, बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचे बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाले. अशातच वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, बॉयकॉट ट्रेंडमध्येही त्याचे चित्रपट चांगली कामगिरी कसे करतात, याबद्दल रोहितने खुलासा केला.
“…म्हणून मी त्यांना चित्रपटात घेतो”, रोहित शेट्टीचं मराठी कलाकारांबाबत मोठं वक्तव्य
‘बॉलिवूड लाईफ’शी बोलताना रोहित म्हणाला, “खरं तर माझे चित्रपट चांगले चालतात, यामागे कोणतंही सिक्रेट नाही. माझ्यावर अनेक वर्षांपासून विश्वास ठेवणारे प्रेक्षक आहेत. माझा ‘गोलमाल’ चित्रपट २००६ मध्ये रिलीज झाला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत प्रेक्षक माझ्यावर विश्वास ठेवतात. मी महान दिग्दर्शक आहे असं नाही, लोक माझे चित्रपट स्वतःचे मानतात, त्यामुळे ते बघतात आणि ते रोहित शेट्टीच्या चित्रपटाची वाट पाहत असतात,” असं रोहितने सांगितलं.
दरम्यान, यावेळी रोहित शेट्टीला प्रादेशिक सिनेमांच्या तुलनेत बॉलिवूडसाठी हे वर्ष तितकं चांगल राहिलं नाही, असं विचारण्यात आलं. तेव्हा रोहितने म्हटलं की हे फक्त एक वाईट वर्ष होतं आणि पहिल्यांदाच लोकांनी बॉलिवूड चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे. “या वर्षाच्या सुरुवातीला सूर्यवंशी रिलीज झाला होता. त्यानंतर द काश्मीर फाइल्स आणि भूल भुलैया २ सारख्या चित्रपटांनी चांगलं काम केलं. दृश्यम २ ने अलीकडेच चांगली कामगिरी केली आहे. आमचे चित्रपट चालत नाहीत असं नाही. गंगूबाई काठियावाडीने तर उत्तम कमाई केली. फक्त एक वर्ष खराब गेलं म्हणून तुम्ही असं म्हणून शकत नाही,” असंही तो म्हणाला.