५० दिवस पूर्ण करून ८०० स्क्रीन्सवर झळकणारा ‘पठाण’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. शाहरुख खानने या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवरची गणितंच बदलून टाकली. रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करत शाहरुखच्या ‘पठाण’ने एक वेगळाच इतिहास रचला. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला तरी याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत टीकाकारांना चोख उत्तर दिलं.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही महीने आधीच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली. हे प्रकरण चांगलंच गाजलं. आर्यन खानला या प्रकरणात आता क्लीन चीट जरी मिळाली असली तरी त्यावेळी हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. सगळ्याच स्तरातून शाहरुख खानवर टीका होत होती. काही लोक शाहरुखवर वैयक्तिक टीका करत होते तर काही लोकांनी ‘बॉयकॉट’चं अस्त्र बाहेर काढलं.
आणखी वाचा : विवेक अग्निहोत्री यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून कोर्टात हजर राहण्याचे आदेश; ‘हे’ आहे कारण
या संपूर्ण केसदरम्यान शाहरुख खान आणि त्याचा परिवारातील कुणीच यावर प्रतिक्रिया दिली नाही. शिवाय ‘पठाण’ एवढा सुपरहीट होऊनसुद्धा त्यांच्यापैकी कुणीच या प्रकरणावर भाष्य केलं नाही. याबद्दल बऱ्याचदा शाहरुखला विचारण्याचा प्रयत्न झाला, पण एवढी टीका होऊनसुद्धा शाहरुख आणि त्याचं कुटुंब काहीही न बोलता मौन बाळगून का होतं? ‘अमर उजाला’च्या वृत्तानुसार या गोष्टीचा खुलासा शाहरुखच्याच एका खास मित्राने केला आहे.
अभिनेता, फिल्ममेकर आणि शाहरुख खानचा जुना मित्र विवेक वासवानी यांनी मीडियाशी संवाद साधताना शाहरुख खानच्या संयमी वागण्यावर भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर शाहरुखने असं का केलं यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे. विवेक म्हणाले, “मला वाटतं की ही गोष्ट त्यांना आणखी वाढवायची नव्हती म्हणून शाहरुख गप्प होता, शिवाय गौरी आर्यन सुहाना कुणीच यावर भाष्य म्हणूनच केलं नाही. त्याचं हे वागणं एका प्रतिष्ठित व्यक्तीला अगदी साजेसं होतं. शाहरुखच्या या वर्तणूकीचं सगळ्यांनीच अनुकरण करायला हवं.” शाहरुखच्या ‘पठाण’च्या वेळेसही याविषयी चर्चा होत होती आणि यावर काहीच भाष्य करायला लागू नये यासाठीच शाहरुखने चित्रपटाचं प्रमोशनही केलं नाही असं सांगण्यात येतं.