नुकताच बॉलिवूडचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये पार पडला. आधीच्या वर्षांप्रमाणे यंदाही या पुरस्कारांवर बरीच टीका झाली. प्रेक्षकांना जे जे चित्रपट आवडले अन् त्यांनी जे चित्रपट डोक्यावर घेतले त्यांना बरोबर बाजूला सारत वेगळ्याच चित्रपटांना आणि कलाकारांना पुरस्कार दिल्याचा आरोप बऱ्याच लोकांनी केला आहे. यंदाच्या फिल्मफेअर सोहळ्यात रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ने बाजी मारली. तर विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ व विधू विनोद चोप्रा यांच्या ’12th fail’ या दोन्ही चित्रपटांना फारसा वाव मिळाला नाही.
बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर यंदाच्या फिल्मफेअर सोहळ्यावर टीका केली. हे पुरस्कार विकत घेण्यात आले असून यात काहीही तथ्य नसल्याचंही बऱ्याच लोकांनी म्हंटलं आहे. उत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्रीचा पुरस्कार रणबीर कपूर व आलिया भट्टला मिळाल्यानेही लोक नाराज झाले आहेत. अशातच आता कॉमेडीयन रोहन जोशीनेदेखील यावर एक गमंतीशीर व्हिडीओ शेअर करत या पुरस्कार सोहळ्यावर चांगलीच टीका केली आहे.
आणखी वाचा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
या व्हिडीओमध्ये रोहन जोशी फिल्मफेअरच्या स्टाईलमध्ये वेगवेगळे पुरस्कार जाहीर करताना दिसत आहे. हे पुरस्कार करताना कसा भेदभाव केला जातो हे त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओमध्ये रोहन जोशी म्हणतो. “मधूमहावरील उत्तम औषधाचा पुरस्कार जातो २ कीलो साखरेला, तर मधूमेहावरील औषधाचा क्रिटीक निवड पुरस्कार जातो इंसुलिनला. उत्कृष्ट हिरव्या पालेभाजीचा पुरस्कार मिळतो मटणाला तर उत्कृष्ट पालेभाजीचा ज्यूरी क्रिटीक पुरस्कार जातो पालकाला.”
अशा रीतीने मार्मिक पद्धतीने भाष्य करत रोहनने फिल्मफेअरवर जबरदस्त टीका केली आहे. सोशल मीडियावर रोहनचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. चांगल्या चित्रपटांना, चांगल्या कलाकारांना डावलून केवळ स्पॉन्सरना खुश ठेवण्यासाठी हे पुरस्कार दिले गेले असल्याची खंत एका युझरने या व्हिडीओखाली व्यक्त केली आहे. याबरोबरच शाहरुख खान व विक्रांत मॅसेसारख्या कलाकारांना एकही पुरस्कार न मिळाल्यानेही बरेच चाहते व सिनेप्रेमी नाराज झाले आहेत.