बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर नवाजुद्दीनच्या भावानेही त्याच्यावर आरोप केले होते. अशातच आता अभिनेत्याविरोधात एका वेगळ्या कारणासाठी तक्रार दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नवाजुद्दीनच्या अडचणी वाढल्या आहेत.
नवाजुद्दीनवर ‘कोका कोला’च्या एका जाहिरातीमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाहिरातीतून बंगाली समुदायाच्या भावना दुखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नवाजुद्दीन सिद्दीकी व कोका कोलाच्या भारतीय विभागाच्या सीईओविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. कोका कोलाच्या जाहिरताच्या हिंदी व्हर्जनबाबत तक्रार नसून बंगाली व्हर्जनमधील एका वाक्यामुळे समुदायाच्या भावना दुखावल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा>> रितेश देशमुखने भर कार्यक्रमात मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाला, “तुम्ही महाराष्ट्रासाठी…”
Live Mint ने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाताचे उच्च न्यायालयातील वकील दिब्यान बॅनर्जी यांनी तक्रार दाखल केली आहे. “कोका कोलाच्या हिंदी जाहिरातीवर आमचा आक्षेप नाही. या जाहिरातीच्या बंगाली व्हर्जनवर आक्षेप आहे. कोका कोलाच्या बंगाली जाहिरातीत ‘शोजा अंगुले घी न उठले, बंगाली खाली पेटे घूमिए पोरे’ म्हणजेच ‘बंगाली लोकांना सहजपणे काही मिळालं नाही, तर ते उपाशी राहतात’ असं वाक्य आहे. या वाक्यावर नवाजुद्दीन हसताना दिसत आहे. यामुळे बंगाली समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या कृतींना प्रोत्साहन दिलं गेलं नाही पाहिजे,” असं तक्रार केलेल्या वकिलांचे म्हणणं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, तक्रार दाखल केल्यानंतर कंपनीने नवाजुद्दीन सिद्दीकीची बंगाली व्हर्जनची जाहिरात काढून टाकण्यात आली आहे. यासंबंधी कंपनीकडून एक निवेदनही जारी करण्यात आलं आहे. “जाहिरातीबाबत आम्हाला खेद असून बंगाली भाषेचा आम्ही सन्मान करतो,” असं निवेदनात म्हटलं गेलं आहे.