मागच्या एका आठवड्यापासून दीपिका पदुकोण चांगलीच चर्चेत आहे. दीपिका पदुकोण व तिचा पती रणवीर सिंह यांनी ‘कॉफी विथ करण’ या शोच्या ८ व्या पर्वात हजेरी लावली. यावेळी त्यांनी एकत्र केलेले सिनेमे, त्यांचं नातं, डेटिंगचा काळ, आयुष्यातील कठीण प्रसंग अशा बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं. पण या शोमध्ये दीपिकाने डेटिंगबद्दल केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं. यावरून आता काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पोस्ट करत ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे.
‘या’ अभिनेत्रीने ‘रामलीला’ सोडल्याने लागलेली दीपिका पदुकोणची वर्णी, रणवीर सिंह खुलासा करत म्हणाला…
काय म्हणाली होती दीपिका पदुकोण?
दीपिका पदुकोणने रणवीर आयुष्यात आल्यावरही आपण इतरांना भेटत असल्याचं म्हटलं होतं. “आधीच्या रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यावर मी काही काळ सिंगल राहायचं ठरवलं होतं, कारण ती नाती माझ्यासाठी खूप कठीण राहिली होती. त्यानंतर माझ्या आयुष्यात रणवीर आला, मात्र त्याने मला प्रपोज करेपर्यंत मी त्याला नात्याबद्दल कोणतीही कमिटमेंट दिली नव्हती. तेव्हा आम्ही योग्य जोडीदार शोधण्यासाठी इतरांना भेटत होतो व काही पर्याय बघत होतो. पण जेव्हा मी इतरांना भेटायचे, तेव्हा माझ्या डोक्यात सतत रणवीरचाच विचार यायचा,” असं दीपिका म्हणाली होती.
सुप्रिया श्रीनेत यांची पोस्ट काय?
“आपण काय बनलो आहोत?
एक जोडपं एका टॉक शोमध्ये एकत्र येतं, त्यांचं नातं, त्यांचे लग्न, त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल बोलतं.
एक तरुण स्त्री, जी एक सुपर अचिव्हर आहे, जी तिच्या मानसिक आरोग्याबाबतच्या संघर्षांबद्दल बोलते. इतकंच नाही तर ती मानसिक आजाराचा सामना करण्यासाठी अनेकांना प्रोत्साहन देते.
एक तरूण, जो ती त्या मानसिक आघातातून जात असताना तिच्या पाठीशी कसा उभा राहिला याबद्दल बोलतो.
एक समाज म्हणून ज्या मुद्द्यांवर आपण बोलत नाही, त्याबद्दल बोलण्याच्या त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्याऐवजी ते दीपिकाला ट्रोल करत आहेत. त्या एपिसोडनंतर तिला ट्रोल केलं जातंय, तिच्या चारित्र्यावर सवाल केले जात आहे आणि ती अश्लील मीम्सचा विषय बनली आहे.
लोक वास्तव का स्वीकारू शकत नाहीत, त्यांना त्यांच्या मानवी भावना इतक्या अस्वस्थ का करतात? लोक इतके कडवट, इतके द्वेषाने भरलेले, इतके अमानवी आणि इतके जजमेंटल का झाले आहेत?
पण सत्य हे आहे की ज्या द्वेषाने तिला ट्रोल करत आहेत, त्याने त्यांना काही फरक पडत नाही. कारण द्वेष आणि गैरवर्तन निनावी, क्षुल्लक लोकांकडून येतंय जे लोक त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात दुःखी, चिडलेले आहेत, जे नैराश्यात जगत आहेत.
खरं तर दीपिका कधी दिसली तर हेच ट्रोलर्स तिच्याबरोबर सेल्फी काढायला सर्वात आधी धावतील. मला वाटतं की या ट्रोलर्सना खरंच आपुलकीची गरज आहे आणि मी प्रार्थना करते की त्यांना प्रेमही मिळो!
कारण प्रेम तुम्हाला एक चांगला माणूस बनवते. आणि तिने म्हटल्याप्रमाणे तिला थांबवता येईल असा विचार करण्याची चूक करू नका!,” अशी पोस्ट सुप्रिया श्रीनेत यांनी केली आहे.
दरम्यान, करण जोहरने देखील दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं. “तुम्हाला जे करायचे आहे ते करा कारण ट्रोलिंगकडे कोणी लक्ष देत नाहीये. ट्रोलिंग करून तुम्हाला काहीच मिळणार नाहीये,” अशा शब्दांत करणने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं.