कवी कुमार विश्वास यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर टिप्पणी केल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील एका कार्यक्रमादरम्यान कुमार विश्वास यांनी पालकांनी आपल्या मुलांना रामायण शिकवले पाहिजे असे म्हणत अभिनेत्रीच्या विवाहावर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. आता काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या या वक्तव्याला अपमानास्पद म्हटले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कुमार विश्वास यांनी म्हटले, “तुमच्या मुलांना प्रभू श्रीरामाच्या भावांची नावे शिकवा आणि देवी सीतेच्या बहिणींची नावे शिकवा. त्यांना रामायण आणि गीता शिकवा. नाहीतर तुमच्या घराचे नाव रामायण असले तरी, तुमच्या घरातील श्री लक्ष्मी कोणीतरी दुसरेच घेऊन जाईल.” त्यांच्या या वक्तव्याचा संबंध शत्रुघ्न सिन्हा व सोनाक्षीशी लावण्यात आला. कारण- शत्रुघ्न सिन्हांच्या घराचे नाव रामायण असे आहे. याबरोबरच, त्यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने जहीर इक्बालबरोबर आंतरधर्मीय लग्न केले आहे. आता कुमार विश्वास यांच्या व्हिडीओवर अनेकविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
काय म्हणाल्या सुप्रिया श्रीनेत?
काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी त्यांच्या विधानाला अपमानास्पद म्हटले आहे. एक्सवर पोस्ट शेअर करीत त्यांनी लिहिले, “तुमच्या घरात मुलगी असेल, तर तुम्ही इतर कोणाच्या तरी मुलीबद्दल असभ्य कमेंट्स करत अशा टाळ्या स्विकारल्या असत्या का? यावरून तुम्ही किती खालची पातळी गाठली आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तुम्ही सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर फक्त टिप्पणीच केली नाही तर महिलांप्रति तुमचे विचार काय आहेत, हेसुद्धा दाखवून दिले आहे. तुम्ही असे म्हटले की तुमच्या श्री लक्ष्मीला कोणीतरी दुसरे उचलून घेऊन जाईल. तिला कोणी कुठे उचलून घेऊन जायला मुलगी कोणतं साहित्य आहे का? तुमच्यासारखे लोक कधीपर्यंत महिलेला आधी वडिलांची व नंतर पतीची संपत्ती समजणार आहात? विवाह हा आपापसांतील प्रेम, विश्वास आणि समानता अशा गोष्टींवर टिकतो. कोणी कोणाला कुठे घेऊन जाऊ शकत नाही.”
पुढे त्यांनी लिहिले, “२०२४ मध्ये भारतात मर्जीने लग्न केल्यामुळे त्यांच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह करत आहात? एका मुलीला तिच्या मर्जीनुसार लग्न करण्याचा हक्क नाही का? कि कोण काय खाणार, कोणते कपडे परिधान करणार, कोणावर प्रेम करणार, कसे लग्न करणार याचे निर्णयसुद्धा धर्माचे स्वयंघोषित ठेकेदार घेणार आहेत?”
या पोस्टमध्ये पुढे त्यांनी शत्रुघ्न सिन्हा किंवा त्यांच्या यशस्वी मुलगी सोनाक्षीला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. स्वत:पेक्षा १७ वर्षे लहान मुलीवर टीका करून स्वत:चे खरे विचार उघड केल्याचे त्यांनी म्हटले. याबरोबरच तुम्ही स्वत:ची चूक सुधारत वडील व मुलगी दोघांची माफी मागितली पाहिजे असेही म्हटले.
u
दरम्यान, सात वर्षे डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि जहीरने २३ जून २०२४ ला लग्नगाठ बांधली. त्यावेळीसुद्धा अनेकांनी शत्रुघ्न सिन्हा व सोनाक्षी सिन्हा यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. काही दिवसांपूर्वीच अभिनेते मुकेश खन्ना यांनी रामायणावर आधारित एका प्रश्नाचे उत्तर न आल्याने सोनाक्षीवर टीका केली होती. त्यावेळी सोनाक्षीने त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उत्तर दिले होते. तिने पोस्ट केल्यानंतर मुकेश खन्ना यांनी त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिल्याचे पाहायला मिळाले. आता कुमार विश्वास माफी मागणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.