Sanvi Sudeep Salman Khan: कन्नड अभिनेता किच्चा सुदीपची मुलगी सान्वीने ‘दबंग ३’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या भाईजानबरोबरच्या आठवणी सांगितल्या आहे. किच्चा सुदीपने ‘दबंग ३’मध्ये खलनायकाची भूमिका केली होती. सिनेमाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा सान्वी १५ वर्षांची होती. ती सलमानची खूप मोठी चाहती होती, त्यामुळे तिच्या वडिलांबरोबर शूटिंगला आली होती. सलमानबद्दल गैरसमज आहेत, तो खूप चांगला आहे, असं सान्वी म्हणाली.

‘दबंग ३’ सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वडिलांबरोबर मुंबईत आलेल्या सान्वीचे सलमान खानने खूप लाड केले होते.

जिनल मोदीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना २१ वर्षीय सान्वीने सिनेमाच्या शूटिंगच्या आठवणी सांगितल्या. “जेव्हा पप्पा ‘दबंग ३’ चित्रपटाचे शूटिंग करत होते, ते माझ्या आयुष्यातील सर्वात मजेदार दिवस होते. मी लहानपणी सलमान खान यांच्यासाठी एक ब्रेसलेट बनवले होते आणि त्यांनी ते बिग बॉसमध्येही घातले होते. त्यामुळे ‘दबंग ३’ दरम्यान भेटल्यावर ती आठवण ताजी झाली,” असं सान्वी म्हणाली.

सान्वीला वडिलांनी दिलेलं सरप्राइज

सान्वीने सांगितलं की शूटिंगनंतर तिचे वडील तिला मुंबईला घेऊन गेले आणि ते सलमानच्या घरी जेवायला गेले. सलमानच्या घरी जाणं हे सान्वीला तिच्या वडिलांनी दिलेलं सरप्राइज होतं. “मी त्यांना पाहिलं आणि मी विचार करत होते की अरे देवा, हे तर सलमान सर आहेत. त्या दिवशी त्यांनी माझे खूप लाड केले. त्यांनी मला गाणं गाण्यास सांगितलं. मग मी त्यांच्यासाठी गाणं गायलं,” असं सान्वी म्हणाली.

“त्यांनी पहाटे ३ वाजता एका संगीत दिग्दर्शकाला फोन केला आणि मी हिला तुझ्याकडे पाठवत आहे असं सांगितलं. ते म्हणाले की हिचा आवाज रेकॉर्ड करून ठेव, जर एखाद्या कामासाठी आपल्याला तिच्या आवाजाची गरज भासली तर आपण वापरू. नंतर दुसऱ्या दिवशी मी त्या संगीत दिग्दर्शकाकडे गेले. त्यानंतर सलमान खान यांनी मला पुन्हा त्यांच्या फार्महाऊसवर बोलावलं. माझे आई-वडील माझ्याबरोबर आहेत की नाही याची मला पर्वा नव्हती. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्याबरोबर राहायचे,” असं सान्वी म्हणाली.

सान्वी सलमानबरोबर जिममध्ये जायची

“ते मला त्यांच्याबरोबर जिममध्ये न्यायचे. आम्ही पोहायला जायचो आणि मला कार-बाईक खूप आवडतात, म्हणून त्यांनी मला मॉन्स्टर ट्रकसारख्या एका छानशा कारमध्ये नेलं. ते मला जंगलात फिरायला न्यायचे, खूप मजा यायची. त्यांच्या फार्महाऊसवर घालवलेले ते तीन दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण होते,” असं सान्वीने नमूद केलं.

Story img Loader