दलिप ताहिल हे बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेते आहेत ज्यांनी कित्येक चित्रपटातील खलनायकाच्या भूमिका अजरामर केल्या आहेत. केवळ खलनायकच नव्हे तर कित्येक चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिकादेखील त्याच ताकदीने केल्या आहेत. मध्यंतरी ‘आखरी रास्ता’ या चित्रपटातील एका रेप सीन दरम्यान दलिप ताहिल हे वाहवत गेले आणि अभिनेत्री जया प्रदा यांनी त्याला थोबाडीत मारल्याचा किस्सा चांगलाच व्हायरल झाला होता. हा किस्सा मध्यंतरी बऱ्याच सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळाला होता.
या घटनेबद्दल नुकतंच अभिनेते दलिप ताहिल यांनी मौन सोडलं आहे. या चित्रपटात एक रेप सीन चित्रित करण्यात आला होता आणि यादरम्यान दलिप ताहिल वाहवत गेले आणि रागावलेल्या जया प्रदा यांनी दलिप यांना थोबाडीत मारली ही घटना कधी घडलीच नाही असं दलिप ताहिल यांनी स्पष्ट केलं आहे.
याविषयी ‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना दलिप ताहिल म्हणाले, “मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, मी जया प्रदा यांच्याबरोबर कधीच स्क्रीन शेअर केली नाही. माझी तशी खूप इच्छा होती, पण मला कधीच ती संधी मिळाली नाही. असा कोणताही सीन आमच्यावर चित्रित झालेला नाही. याविषयी लिहिणाऱ्य व्यक्तिबद्दल माझ्या मनात कसलाही आकस नाही, उलट त्या व्यक्तिने तो सीन मला दाखवावा अशी माझी इच्छा आहे. सध्या सोशल मीडियावर अशा बऱ्याच घटना रंगवून सांगितल्या जात आहेत ज्या कधीच घडलेल्या नाहीत.”
आणखी वाचा : विश्लेषण: चित्रपट वितरणातून नेमका आर्थिक फायदा कसा होतो? कसे होतात देवणघेवाणीचे व्यवहार?
दलिप ताहिल यांच्या स्पष्टीकरणामुळे या मुद्द्याला पूर्णविराम मिळाला आहे, शिवाय या स्पष्टीकरणामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा कित्येक घटनांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दलिप यांनी १०० हून अधिक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. त्यापैकी ‘बाजीगर’, ‘कयामत से कयामत तक’, ‘कहो ना प्यार है’, ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत.