आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं १६ फेब्रुवारीला दिल्लीत निधन झालं. ती फक्त १९ वर्षांची होती. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. सुहानी एका दुर्मिळ आजाराशी झुंज देत होती. तिच्या निधनाची पुष्टी आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या पालकांनी मीडियाशी संवाद साधताना सुहानीला नेमकं काय झालं होतं याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
सुहानीचे वडील मीडियाशी संवाद साधताना म्हणाले, “दोन महिन्यांपूर्वी तिच्या हाताला सूज येऊ लागली. सुरुवातीला आम्हाला या गोष्टी अतिशय सामान्य वाटल्या पण, कालांतराने तशीच सूज तिच्या दुसऱ्या हाताला आली. त्यानंतर संपूर्ण शरीरात ही सूज पसरली. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊनही कोणालाही या आजाराचं निदान झालं नाही. शेवटी ११ दिवसांपूर्वी आम्ही तिला एम्समध्ये दाखल केलं.”
हेही वाचा : ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन, अवघ्या १९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
“सुहानीला रुग्णालयात दाखल केल्यावर तिच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. यामधून तिला डर्माटोमायोसिटिस हा दुर्मिळ आजार झाल्याचं समोर आलं. या आजारावर स्टेरॉईड्स हा एकमेव उपचार आहे. परंतु, याच स्टेरॉईड्समुळे तिच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम झाला आणि दिवसेंदिवस ती कमकुवत झाली.” असं सुहानीच्या वडिलांनी सांगितलं.
सुहानीचे वडील पुढे म्हणाले, “डॉक्टरांच्या मते, या आजारातून बरं होण्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र, कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे सुहानीचा संसर्ग वाढत गेला. तिची फुफ्फुसे कमकुवत झाली. यामुळे संपूर्ण शरीरात द्रव जमा होऊन तिला श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली. अखेर १६ फेब्रुवारीला तिने या जगाचा निरोप घेतला.”
हेही वाचा : ‘घायल’ चे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना दोन वर्षांचा तुरुंगवास, जामनगर न्यायालयाने सुनावली शिक्षा
“सुहानी लहानपणापासून मॉडेलिंगमध्ये सक्रिय होती. जवळपास २५ हजार मुलांमधून ‘दंगल’साठी तिची निवड झाली होती. ती लहानपणापासूनच कॅमेरा फ्रेंडली होती. सध्या सुहानी मास कम्युनिकेशन- जर्नालिझमचा कोर्स करत होती आणि दुसऱ्या वर्षाला होती. तिला आपलं शिक्षण पूर्ण करून चित्रपटांमध्ये काम करायचं होतं.” असं सुहानीच्या आईने माध्यमांना सांगितलं.
दरम्यान, सुहानी इन्स्टाग्रामवर फारशी सक्रिय नव्हती. तिची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट नोव्हेंबर २०२१ ची आहे. ‘दंगल’नंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने चित्रपटाच्या ऑफर्स स्वीकारल्या नव्हत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर मनोरंजन विश्वाकडे वळणार असल्याचं तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.