David Dhawan on OTT: डेव्हिड धवन हे बॉलीवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी आजवर प्रेक्षकांसाठी एकापेक्षा एक उत्तम विनोदी चित्रपट आणले आहेत. त्यांचे सुपरहिट चित्रपट अजूनही प्रेक्षकांना खळखळून हसवतात. विनोदाला रोमान्सची जोड देऊन त्यांनी बनवलेल्या चित्रपटांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. डेव्हिड धवन निवडक चित्रपट करतात. सध्या ओटीटीचा सगळीकडे बोलबाला आहे, अशातच धवन यांनी ओटीटीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
डेव्हिड धवन ओटीटीला फक्त एक माध्यम मानतात आणि ते ओटीटीमुळे फारसे खूश नाहीत. त्यांचं पहिलं प्रेम अजूनही थिएटर आहे, थिएटरसारखा अनुभव ओटीटी देऊ शकत नाही, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. त्यांनी एका मुलाखतीत ओटीटी कलाकारांना आव्हान दिलं आहे.
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्याची क्रेझ अजून संपलेली नाही, असा डेव्हिड धवन यांना विश्वास आहे. त्यांच्या मते, ओटीटी हे चित्रपट निर्मात्यांसाठी एक सुरक्षित व्यासपीठ आहे, ज्यामुळे त्यांना मीडिया टेस्टिंग व बॉक्स ऑफिस निकालांचा दबाव नसतो. पण थिएटरच्या अनुभवाच्या तुलनेत ओटीटी काहीच नाही.
तृप्ती डिमरीचा सुपरफ्लॉप चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित, दोन दिवसांत कमावले…
डेव्हिड धवन यांनी दिलं आव्हान
अरबाज खानशी बोलताना डेव्हिड ओटीटी कलाकारांना म्हणाले, “थिएटरमध्ये या आणि तुमची लायकी दाखवा. ओटीटी कलाकार थिएटर चित्रपट करू शकणार नाहीत. पण शेवटी तुमचं कौतुक फक्त थिएटरमध्येच होतं. एखाद्या महत्त्वाच्या सीनवेळी टाळ्यांचा कडकडाट होतो, तेव्हा तिथे हजर असलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेपेक्षा मोठं काहीही नाही. ओटीटीवर तुम्हाला अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत नाही.”
डेव्हिड म्हणाले की ते मनापासून थिएटरप्रेमी आहेत आणि चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होतो त्यावेळी येणारी अनोखी उर्जा इतर कोणतेही व्यासपीठ तयार करू शकत नाही.
डेव्हिड धवन यांच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास तो गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ चा रिमेक होता. करोनामुळे तो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खान होते. लवकरच डेव्हिड धवन मुलगा वरुणबरोबर रोमँटिक कॉमेडी चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे.या चित्रपटाचे नाव ‘जवानी तो इश्क होना है’ असं ठेवण्यात आलं आहे. हा चित्रपट ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रदर्शित होईल, असं म्हटलं जात आहे.