Dilwale Dulhania Le Jayenge : शाहरुख खान आणि काजोल यांच्या जोडीने बॉलीवूडमध्ये एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या दोघांनी अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. या जोडीचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा सिनेमा सर्वत्र तुफान गाजला. १९९५ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यंदा राज-सिम्रनच्या एव्हरग्रीन लव्हस्टोरीला ३० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने एक खास घोषणा करण्यात आली आहे.

२० ऑक्टोबर १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला होता. या सिनेमाला ३० वर्षे पूर्ण होणार असल्याने लंडनमध्ये खास पुतळा उभारण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. लंडनमध्ये शाहरुख आणि काजोल अर्थात राज-सिम्रन या आयकॉनिक जोडीचा कांस्य पुतळा बसवला जाणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे.

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमाने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातील प्रेक्षकांच्या मनावर सुद्धा अधिराज्य गाजवलं यामुळेच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लंडनमध्ये बॉलीवूड चित्रपटातील पात्रांचा पुतळा उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्स’ने आज पुतळा उभारण्यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. लेस्टर स्क्वेअरमधील ‘सीन्स इन द स्क्वेअर’ या चित्रपटाच्या ट्रेलमध्ये हा नवीन पुतळा बसवला जाणार आहे. याठिकाणी सध्या ‘हॅरी पॉटर’, ‘लॉरेल अँड हार्डी’, ‘बग्स बनी’, ‘सिंगिंग इन द रेन’मधील जीन केली, ‘मेरी पॉपिन्स’, ‘मिस्टर बीन’, ‘पॅडिंग्टन अँड डीसी सुपर-हिरो बॅटमॅन’ आणि ‘वंडर वुमन’ या चित्रपटांमधील पुतळे आहेत. आता यांच्या जोडीला शाहरुख-काजोलचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील पुतळा बसवला जाणार आहे.

‘यशराज फिल्म्स’चे सीईओ अक्षय विधानी याबद्दल म्हणाले, “जेव्हा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ( DDLJ ) ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला, तेव्हा हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खूप महत्त्वाचा ठरला होता. या सिनेमाने बॉलीवूडचा चेहरामोहरा बदलून टाकला. याशिवाय जगभरात हा सिनेमा पाहिला गेला. ‘सीन्स इन द स्क्वेअर’ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे याचा आम्हाला आनंद आहे. जीन केली ते हॅरी पॉटर अशा हॉलिवूडच्या अभिजात वर्गासह आमचे स्टार्स झळकणार ही मोठी गोष्ट आहे. ही सगळ्या देशवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.”