‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील रोमँटिक राज, ‘चक दे इंडिया’ चित्रपटातील कडक शिस्तीचा प्रशिक्षक कबीर खान, ‘कुछ कुछ होता है’मधील राहुल, ‘स्वदेश’ चित्रपटातील मोहन भार्गव किंवा ‘बाजीगर’मध्ये दुहेरी भूमिका निभावत शाहरुख खान(Shah Rukh Khan)ने ही पात्रे त्याच्या अभिनयाने अजरामर केली. या भूमिकांबरोबच त्याने ‘कल हो ना हो’मध्ये साकारलेले अमन माथूरचे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता या चित्रपटात सहायक अभिनेत्री म्हणून काम केलेल्या डेलनाज इराणीने एका मुलाखतीत ‘कल हो ना हो’मधील एका सीनबद्दलची आठवण सांगितली आहे.
‘कल हो ना हो’ चित्रपटातील शाहरुखच्या मृत्यूचा सीन
डेलनाज इराणीने ‘बॉलीवूड हंगामा’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘कल हो ना हो’ चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगताना तिने म्हटले की, चित्रपटाचा शेवटचा सीन शूट करायचा होता. तो अमनच्या मृत्यूचा सीन होता. मला आजही स्पष्ट आठवते की, मला टीव्हीवरील एका शोच्या शूटिंगसाठी जायचे होते. त्यामुळे मी दिग्दर्शकांना विचारले की, मला सुट्टी मिळू शकते का? त्यांनी मला म्हटले, “हे बघ डेलनाज हा खूप महत्त्वाचा सीन आहे. चित्रपटाचा हा सर्वांत मोठा भाग आहे. तू या सीनसाठी थांबणे गरजेचे आहे.” त्यांनी असे म्हटल्यानंतर त्या दिवशीचे टीव्हीचे शूटिंग मी रद्द केले आणि त्या सीनच्या शूटसाठी थांबले.
डेलनाज इराणीने पुढे सांगितले, “अमनच्या मृत्यूच्या सीनचा मी भाग होते. याचा मला आनंद वाटतो. कारण- हा खूप महत्त्वाचा भाग होता. तिथे उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांमुळे त्या सीनला पूर्णत्व आले. तिथे जे वातावरण तयार झाले होते, ते खरे होते. कोणत्याही कलाकाराने ग्लिसरिनचा वापर केला नव्हता. सगळे जण खरोखरच रडत होते. त्यामागील सगळ्यांच्या भावना खऱ्या होत्या. त्यामुळे तो सीन कायम आठवणीत राहिला.”
हेही वाचा: Kanguva: ३५० कोटींचे बजेट असलेल्या ‘कंगुवा’ची निराशाजनक सुरुवात, कमावले फक्त…
डेलनाज इराणीने सांगितलेला चित्रपटातील सर्वांत भावूक सीन आहे. जिथे अमन मृत्यूचा दारात असतो आणि सगळे त्याला भेटायला जातात. अमनचा मृत्यू होतो. या चित्रपटात अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. प्रीती झिंटा ही नैना आणि सैफ अली खान हा रोहित या भूमिकेत काम करताना दिसले आहेत. तर, शाहरुख खानने अमनच्या भूमिका साकारली होती. त्याला दुर्मीळ आजार असतो. तो नैनाच्या प्रेमात पडतो आणि तीदेखील त्याच्या प्रेमात पडते. मात्र, अमनला त्याच्या आजाराची जाणीव असल्याने तो नैनाला तिच्या मित्राच्या रोहितच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. नैना आणि रोहितच्या लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान अमनला अॅटॅक येतो आणि त्याचे निधन होते, अशा आशयाचे चित्रपटाचे कथानक आहे.
दरम्यान, बॉक्स ऑफिसवर हिट झालेला ‘कल हो ना हो’ हा चित्रपट लोकप्रिय झाला होता. आज १५ नोव्हेंबरला ‘कल हो ना हो’ सिनेमा थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे.