बॉलीवूड अभिनेता दीपक तिजोरीने चार दिवसांपूर्वी अमृता सिंह व सैफ अली खानचा एक किस्सा सांगितला होता. पण आता मात्र त्याने त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. आपलं विधान वेगळं होतं, पण ते वेगळ्या पद्धतीने छापण्यात आलं असं दीपकने म्हटलं आहे. दीपक नेमकं का स्पष्टीकरण दिलंय? ते जाणून घेऊयात.
आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आसा असं दीपक म्हणाला. अमृताने सैफला ‘पहेला नशा’मध्ये दिसण्यापासून रोखलं होतं, असं लोकांना वाटतंय, पण तसं नव्हतं. उलट कलाकारांचं इतकं चांगलं बाँडिंग पाहून तिला आश्चर्य वाटलं होतं. दीपक म्हणाला, “मला काहीतरी स्पष्ट करायचं आहे. मी अलीकडेच काहीतरी बोललो ज्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. पहेला नशाच्या प्रीमियर सीनसाठी मी इतक्या कलाकारांना कसं एकत्र आणलं होतं, असं मला विचारण्यात आल होतं. त्यावर मी म्हटलं, ‘आम्ही सगळे मित्र होतो. त्यामुळे आम्ही एकमेकांना शक्य तशी साथ दिली.’ मग मी म्हणालो, ‘जेव्हा सैफ अली खान तयार होत होता, तेव्हा अमृता सिंहने त्याला विचारलं की तू कुठे जात आहेस. त्यावर तो म्हणाला, ‘मी दीपकच्या चित्रपटातील प्रीमियर सीन शूट करणार आहे.’ यावर अमृताने म्हणाली, ‘तुमच्या पिढीतील कलाकार वेगळे आहेत. आम्ही कधीच एकमेकांना अशाप्रकारे सपोर्ट केलं नाही. तुमची मैत्री मानायला पाहिजे.”
दीपक तिजोरी म्हणाला की त्याचं म्हणणं चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं. “मी असं म्हटलं होतं, पण अमृताने सैफला प्रीमियरला जाण्यापासून रोखल्याची बातमी प्रसिद्ध झाली. मी तसं कधीच म्हणालो नाही. सैफ आणि इतर कलाकारांमधील बाँडिंग पाहून अमृताला आश्चर्य वाटलं होतं. कारण त्यांच्या काळात त्यांनी एकमेकांना मदत केली नाही. अमृता एक सुंदर स्त्री आहे. एक अभिनेत्री म्हणून तिने नेहमीच सर्वांना साथ दिली आहे. मी तिच्यासोबत काम केलेलं नाही. मात्र, आमच्यासाठी तिचा पहिला चित्रपट बेताब (१९८३) सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. मी तो १०० वेळा पाहिला असेल. माझ्या शब्दांचा इतका चुकीचा अर्थ लावला गेला, जे मी कधी बोललोच नाही. मला वाईट वाटतंय.”
दीपकने आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले असले तरी या व्हायरल कमेंटवर सैफ आणि अमृता या दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दीपकच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘आशिकी’, ‘सडक’, ‘आईना’, ‘संतान’, ‘कभी हा कभी ना’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘टिप्सी’ १० मे रोजी प्रदर्शित होत आहे.