१९९३ साली ‘बाजीगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. ‘बाजीगर’मधील शाहरुख खानने साकारलेली खालनायकाची भूमिका आजही चित्रपटसृष्टीतील त्याच्या करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. त्यावेळी चित्रपटसृष्टीत नवीन असलेल्या शाहरुखसाठी ही भूमिका साकारणे एक मोठे आव्हान होते. परंतु ही नकारात्मक भूमिका साकारत तो एक चतुरस्त्र अभिनेता आहे हे त्याने सगळ्यांसमोर सिद्ध केले.
नुकतंच अभिनेता दीपक तिजोरीने या चित्रपटाशी निगडीत एक गोष्ट शेअर केली आहे. ही चित्रपटसृष्टी नेमकी कशा पद्धतीने काम करते अन् याचा फटका एका अभिनेत्याला कसा बसतो याबद्दल दीपक तिजोरीने भाष्य केलं आहे. १९९३ चा शाहरुखचा सुपरहीट ‘बाजीगर’ चित्रपटात आधी दीपक तिजोरी काम करणार होता असा खुलासा नुकताच अभिनेत्याने केला आहे. अब्बास-मस्तान या जोडगोळीने दिग्दर्शित केलेला हा थ्रिलर चित्रपट ‘अ किस बिफोर डाईंग’ या हॉलिवूड चित्रपटावरुन प्रेरित होता अन् दीपक तिजोरीनेच याची कल्पना ‘अब्बास-मस्तान यांना दिल्याचंही त्याने कबूल केलं.
आणखी वाचा : “चित्रपटसृष्टीत नेपोटीजम असूच शकत नाही कारण…” जावेद अख्तर यांचं विधान चर्चेत
‘बॉलिवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दीपक तिजोरी म्हणाला, “मी ‘अ किस बिफोर डाईंग’ हा चित्रपट पाहिला होता अन् त्याबद्दल अब्बास-मस्तान यांना कल्पनाही दिली होती. तेव्हा चित्रपटसृष्टीत कॉपीराईट वगैरेसारख्या गोष्टींना तितकंसं महत्त्व दिलं जात नसे त्यामुळे बरेचसे चित्रपट हे हॉलिवूड चित्रपटांपासून प्रेरित असायचे. अन् त्यांना मी या चित्रपटाची कथा ऐकवली अन् त्यांना सांगितलं की यातील खलनायकाची भूमिका मी करेन व हीरो आणि इतर कलाकारांसाठी ते इतरांना घेऊ शकतात.”
पुढे दीपक म्हणाला, “त्यांनी लगेच या गोष्टीला होकार दिला. दरम्यान माझे ‘जो जिता वही सिकंदर’ व ‘खिलाडी’ हे चित्रपट लागोपाठ आले अन् हीट झाले अन् मी मुख्य हीरोची भूमिका करेन इतकी लोकप्रियता मला मिळायला सुरुवात झाली. अन् जेव्हा मी ‘बाजीगर’साठी निर्माते पेहलाज नीहलानी यांच्याकडे गेलो तेव्हा मला समजलं की हीच कथा अब्बास-मस्तान व्हीनस स्टुडिओसह बनवत आहेत.”
या एकूण झालेल्या गैरसमजाविषयी दीपकने पुढे स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला, “ही गोष्ट ऐकून मला धक्काच बसला, तेव्हा मी आणि शाहरुख चांगले मित्र होतो, बऱ्याचदा आम्ही पार्टीत भेटायचो. तेव्हा मी त्याला या चित्रपटाबद्दल विचारलं तर त्याने त्याच्याकडे असा एक प्रोजेक्ट आल्याचं स्पष्ट केलं, इतकंच नव्हे तर अब्बास-मस्तान यांनी त्याला त्या हॉलिवूड चित्रपटाची एक व्हीसीडीदेखील दिली होती. दोघा भावांनी नंतर हे स्पष्ट केलं की त्यांनी शाहरुखसह हा चित्रपट करायचं व्हीनस स्टुडिओला सांगितलं आहे अन् आता आयत्यावेळी यात बदल केले तर त्यांच्या फिल्मी करिअरला ब्रेक लागू शकतो. तेव्हा त्यांनी माझ्याबरोबर एक वेगळा चित्रपट करायचंही वचन मला दिलं.”
दीपक म्हणाला, “आता त्यांच्या करिअरचाच प्रश्न होता त्यामुळे मीदेखील या प्रकरणात फार पडलो नाही, अन् पुढे ते माझ्याबरोबर काम करणार नाहीत हेदेखील मला माहीत होतं अन् तसंच झालं, ते फक्त दाखवण्यापुरतंच होतं.”