बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. मागच्या काही दिवसांपासून ‘पठाण’ चित्रपटामुळे सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असलेली दीपिका काही वर्षांपूर्वी तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत होती. रणवीर सिंगला डेट करण्याआधी दीपिका पदुकोणचं रणबीर कपूरशी अफेअर होतं आणि त्यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर दीपिकाने रणवीरला डेट करायला सुरूवात केली होती. पण डेटिंगला सुरुवात केल्यानंतर दीपिकाने ती रणवीर सिंगला कधीही सोडून जाऊ शकते हे स्पष्ट केलं होतं.
रणवीर आणि दीपिकाने एकमेकांना २०१२ मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. पण त्या नात्याबाबत दीपिकाला खात्री नव्हती. तिला सुरुवातीलाच या नात्यात रणवीर सिंगला कोणतीही कमिटमेंट द्यायची नव्हती. कारण त्याआधी तिचं काही वेळा ब्रेकअप झालं होतं. अशात तिला कोणावरही विश्वास ठेवणं कठीण होतं. एका मुलाखतीत दीपिकाने याचा खुलासा केला होता.
आणखी वाचा- दीपिका-रणवीर २०२३ मध्ये होणार आईबाबा? अभिनेत्री म्हणालेली “आम्हाला मूल हवं आहे, पण…”
लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका म्हणाली होती, “जेव्हा मी रणवीरला डेट करायला सुरुवात केली तेव्हा मी मला ओपन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. कारण त्याआधी नात्यांमध्ये माझा विश्वासघात झाला होता. मी कोणत्याही नात्यात माझे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करते. मग ते नातं एका वर्षाचं असो वा ३ किंवा ५ वर्षांचं मी नेहमीच माझ्या पार्टनरशी प्रामाणिक राहिले आहे. अशात जेव्हा रणवीरने मला प्रपोज केलं तेव्हा मी त्याला म्हणाले होते की मी त्याला कोणतीही कमिटमेंट करणार नाही.”
दीपिका पुढे म्हणाली, “मी रणवीरला सांगितलं होतं की हे ओपन रिलेशनशिप असेल, मी तुला कोणतंही वचन देणार नाही. आज मला तुझ्याबद्दल फिलिंग आहेत. पण जर मला काही दिवसांनी किंवा महिन्यांनी असं वाटलं की मला दुसरी कोणतीही व्यक्ती जास्त जवळची वाटतेय. त्याचा सहवास आवडतोय. तर मग मी तुला सोडून देईन आणि माझ्या आयुष्यात पुढे जाईन. विशेष म्हणजे त्याने हे मान्य केलं होतं.”
दरम्यान एका मुलाखतीत रणवीर सिंगनेही हा किस्सा सांगितला होता. याबद्दल बोलताना रणवीर म्हणाला, “तिने तिच्या भावना व्यक्त करतानाच ओपन रिलेशनशिपबद्दल सांगितलं होतं. ती त्यावेळी एका वेगळ्या परिस्थितीतून जात होती. त्यामुळे मी तिचं म्हणणं मान्य केलं. पण त्यावेळी मी पण ठरवलं होतं की, दीपिकाला दुसरं कोणी आवडेल अशी वेळ मी येऊच देणार नाही आणि अखेर घडलंही असंच. आता आमचं लग्न झालंय मी खूप खुश आहे.”