एखाद्या कलाकृतीला ‘ऑस्कर’ (Oscars) पुरस्कार मिळणे ही मनोरंजन जगतात खूप मोठी गोष्ट मानली जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षीचा ऑस्करचा पुरस्कार कलाप्रेमींसाठी खास असतो. यंदाच्या वर्षी किरण रावचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट भारताकडून अधिकृतरित्या ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. पण यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये पहिल्याच फेरीतून हा चित्रपट बाहेर पडला आहे. यामुळे अनेक भारतीयांचा हिरमोड झाला. अनेकांनी तशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. अशातच आता बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणही (Deepika Padukone) व्यक्त झाली आहे.
दीपिका पादुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिने ‘ऑस्करच्या शर्यतीतून एका चांगल्या भारतीय चित्रपटाला वगळण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारतीय चित्रपट आणि भारतीय प्रतिभेबरोबर हे वारंवार घडत आहे’ असं म्हटलं आहे. दीपिकाने पॅरिसमधील लुई व्हिटॉन शोसाठी तयारी करतानाचा व्हिडीओ तिच्या तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात तिने ऑस्करबद्दल हे भाष्य केलं आहे. तसंच २०२३ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ गाण्याच्या विजयाबद्दलची खास आठवणही शेअर केली आहे.
या व्हिडीओमध्ये, दीपिकाने असं म्हटलं आहे की, “भारताला अनेकवेळा ऑस्करपासून वंचित ठेवण्यात आले आहे. एक नाही तर अनेक पात्र चित्रपटांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चित्रपट असोत किंवा प्रतिभा… अनेकदा दुर्लक्ष करण्यात आलं आहे. भारतावर अनेकवेळा अन्याय झाला आहे. पण मला आठवत आहे की, जेव्हा मी प्रेक्षकांमध्ये होते आणि त्यांनी ‘आरआरआर’ हे नाव जाहीर केले तेव्हा मी भावनिक झाली होती. त्या चित्रपटाशी माझा भारतीय असण्याव्यतिरिक्त काहीही संबंध नव्हता. पण माझ्यासाठी तो खूप मोठा भावनिक क्षण होता”.
दीपिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अनेक चित्रपटांची झलक दाखवण्यात आलेली आहे. या व्हिडीओत पायल कपाडियाचा ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’, किरण रावचा ‘लापता लेडीज’, राही अनिल बर्वेचा ‘तुंबाड’ आणि रितेश बत्राचा ‘द लंचबॉक्स’यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांची सर्वत्र प्रचंड प्रशंसा झाली असली, तरी त्यापैकी एकाही चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळालं नाही.
दरम्यान, दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या अभिनेत्री कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करत नाहीय. सध्या ती तिची मुलगी ‘दुआ’च्या संगोपनात व्यस्त आहे. दीपिका शेवटची ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर अनेक कलाकारांची मांदियाळी होती. त्यामुळे आता तिच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अभिनेत्री कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार? याची अनेकजण वाट पाहत आहेत.