Deepika Padukone Ramp Walk : दीपिका पादुकोण गेल्या वर्षभरापासून प्रेग्नन्सीमुळे सिनेविश्वापासून दूर होती. ८ सप्टेंबर रोजी दीपिकाने तिची लेक दुआ पादुकोणला जन्म दिला. पुढचे काही महिने लेकीच्या संगोपनासाठी आपण ब्रेक घेणार असल्याचं दीपिकाने आधीच जाहीर केलं होतं. दुआचा जन्म झाल्यावर मधल्या काळात अभिनेत्री अजिबात माध्यमांसमोर सुद्धा आली नव्हती. काही दिवसांपूर्वीच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना दीपिकाची लेकीच्या जन्मानंतरची पहिली झलक पाहायला मिळाली होती. तिने सर्वांबरोबर हा कॉन्सर्ट एन्जॉय केल्याचं पाहायला मिळालं. पण, आता अभिनेत्री चार महिन्यांनी पुन्हा एकदा कामावर परतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुआच्या जन्मानंतर आता पुन्हा एकदा दीपिकाने तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. सब्यसाची हा बॉलीवूडचा लोकप्रिय फॅशन डिझायनर म्हणून ओळखला जातो. त्याच्या कारकिर्दीला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दीपिकाने लेकीच्या जन्मानंतर पहिला रॅम्प वॉक केला.

दीपिका पादुकोणच्या स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

पांढरी पँट, टॉप आणि ट्रेंच कोटमध्ये दीपिका एकदम ‘बॉस लेडी’सारखी दिसत होती. यावर तिने सब्यसाचीने डिझाइन केलेला आकर्षक नेकलेस घातला होता. यामध्ये चोकर आणि रुबी-डायमंड क्रॉस पेंडेंटचा समावेश होता. याशिवाय हातात काळ्या रंगाचे लेदर ग्लोव्हज, ब्रेसलेट, हेडबँड या लूकमध्ये दीपिका ( Deepika Padukone ) स्टायलिश दिसत होती.

दीपिकाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या लूकची तुलना रेखाबरोबर केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रेखाने सुद्धा अशाच प्रकारचा लूक केला होता. “द अल्टिमेट क्वीन”, “मदर”, “मदर इज मदरिंग” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी दीपिकाचं कौतुक केलं आहे.

दीपिकासह ( Deepika Padukone ) या कार्यक्रमात आलिया भट्ट, बिपाशा बसू, शर्वरी वाघ, अनन्या पांडे, अदिती राव हैदरी, सोनम कपूर, शोभिता धुलिपाला यांसारख्या अभिनेत्री देखील रॅम्प वॉक करताना दिसल्या.

दरम्यान, दीपिका पादुकोण व रणवीर सिंह लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने ८ सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रणवीर व दीपिका यांनी आपल्या लाडक्या लेकीचं नाव दुआ पादुकोण सिंह असं ठेवलं आहे. दुआच्या नावाची घोषणा करताना दीपिकाने तिच्या पायांचा फोटो शेअर केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone first ramp walk after pregnancy for sabyasachi mukherjee 25th anniversary sva 00