‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिका पदुकोणने विविध चित्रपटांत अभिनय करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गेल्या वर्षी दीपिकाची प्रमुख भूमिका असलेल्या पठाण, जवान या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. मात्र, सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीर सिंहला नुकतीच एक मुलगी झाली आहे. आता आई झाल्यानंतर कोणत्या समस्यांचा ती सामना करीत आहे, याबद्दल तिने खुलासा केला आहे.

काय म्हणाली दीपिका?

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने लिव्ह लव्ह लाइफ फाउंडेशनच्या व्याख्यानमालिकेत बोलताना दीपिकाने आरोग्याबद्दलचे तिचे अनुभव सांगितले आहेत. दीपिकाने म्हटले, “जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळालेली नसते किंवा तुम्ही थकलेले असता त्यावेळी त्याचा परिणाम तुम्ही घेत असलेल्या निर्णयांवर होतो. काही वेळा मला हे जाणवते. काही दिवस असे होते की, मला पुरेशी झोप मिळाली नव्हती आणि मी स्वत:ची योग्य प्रकारे काळजीदेखील घेऊ शकले नव्हते; ज्याचा परिणाम माझ्या निर्णयक्षमतेवर झाला होता.”

दीपिकाने पुढे, “अनेकदा लोक चुकीच्या गोष्टींना खासकरून ट्रोलिंगसारख्या गोष्टींना जास्त महत्त्व देतात. वास्तविक यातून शिकून पुढे गेले पाहिजे”, असा सल्ला आपल्या चाहत्यांना दिला.

अभिनेत्री म्हणते, “राग, दु:ख आणि इतर भावना जाणवणे हे सामान्य आहे; पण त्यातून शिकणे अधिक गरजेचे आहे. तुम्ही टीकेला कसे सामोरे जाता आणि त्यातून काय शिकता हे फार महत्त्वाचे आहे. कठोर परिश्रमाबरोबरच तुम्हाला संयम बाळगण्याबाबतही शिकावे लागते.”

दरम्यान, या व्याख्यानमालिकेत बोलताना ओम शांती ओम हा तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिला ट्रोल केले गेले होते. मात्र, त्यातील एक टिप्पणी लक्षात राहिली आणि ती उच्चार, क्षमता, प्रतिभा व शब्दांबाबत होती. त्यामुळे मी स्वत:वर काम केले. तिने म्हटले, “काही टीकात्मक गोष्टी चांगल्या असतात. नकारात्मकता कधी कधी चांगली गोष्ट असते; ज्यामुळे तुम्ही स्वत:मध्ये चांगले बदल घडवता. जेव्हा तुमच्यावर टीका होते, त्यावेळी तुम्ही काय करता आणि ते किती सकारात्मकरीत्या घेता, हे महत्त्वाचे ठरते, असे दीपिकाने सांगितले.

हेही वाचा: ४२ वर्षीय बॉलीवूड अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, साधेपणाने पार पडला विवाह; फोटो आले समोर

दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे, तर ती लवकरच ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात दीपिकाबरोबरच रणवीर सिंह, अजय देवगण, करिना कपूर खान, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. हा चित्रपट १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.