बॉलीवूडचे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी चित्रपट, सोशल मिडियावर पोस्ट केलेले फोटो किंवा वक्तव्ये तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांची चर्चा होते. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडची लाडकी जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हे जोडपं नुकतंच लंडनवरुन भारतात परतलं असून त्यांचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
लवकरच आई-बाबा होणारे दीपिका आणि रणवीर हे बेबीमूनसाठी लंडनमध्ये गेले होते. आपल्या सुट्या संपवून जेव्हा ते मुंबई विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांच्या लूकने लक्ष वेधून घेतले. दोघांनी एकमेकांबरोबर ट्विनिंग करत काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. दीपिकाने काळ्या रंगाचे टॉप-जॅकेट आणि ब्लॅक ट्रॅक पँट, तर रणवीरने काळी पँट, एक लांब कोट आणि पांढरा टी-शर्ट घातला होता. रणवीर आणि दीपिका एकमेकांचा हात हातात घेऊन चालत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. रणवीरने दीपिकाला गाडीत बसण्यासाठी मदत केल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळालं. सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कंमेट करत दीपिका दिवसेंदिवस अधिक सुंदर दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी तिच्या चेहऱ्यावर बेबीमूनचा ग्लो दिसत असल्याचं म्हटलं आहे.
याआधी या जोडप्याचा लंडनच्या कॅफेमधील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. लंडनच्या रस्त्यावर या जोडप्यासोबत मोठी सुरक्षा असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांचे तीन बॉडीगार्ड सतत सोबत असल्याचे दिसून आले होते.
पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यावर रणवीर आणि दीपिकाने १४ नोव्हेंबर २०१८ ला थाटामाटात आपल्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी २०२४ ला आपण पालक होत असल्याची घोषणा केली. तेव्हापासून हे जोडपे कधी कौतुकामुळे तर कधी दीपिका गर्भवती नसल्याच्या अफवांमुळे सतत चर्चेत असते. मात्र या जोडप्याने यावर कोणतेही भाष्य केले नाही.
दीपिका आणि रणबीरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास दीपिका लवकरच ‘ कल्की 2898 AD’ या चित्रपटात दिसणार आहे. नाग आश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दीपिका सोबत अमिताभ बच्चन, कमल हसन आणि प्रभास हे दिग्गज अभिनेते दमदार भूमिकेत दिसणार आहेत. २७ जूनला हा चित्रपट रिलिज होणार असून प्रेक्षकांनादेखील या चित्रपटाची उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे. याबरोबरच, रणवीर ‘सिंघम अगेन’ आणि फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ मध्ये दिसणार आहे.