बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोण (Deepika Padukone)ची ओळख आहे. दीपिका पादुकोणने २००७ साली ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. शाहरुख खानबरोबरचा हा चित्रपट चांगलाच गाजल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खानने केले होते. त्याआधी अभिनेत्रीने २००६ साली कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ‘ऐश्वर्या’ असे या चित्रपटाचे नाव होते.
अभिनेत्रीने ‘यह जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘कॉकटेल’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘खेलें हम जी जान से’, ‘देसी बॉइज’, ‘लव्ह आज कल’ ते ‘ब्रह्मास्त्र’, ‘जवान’, ‘पठाण’, ‘सिंघम अगेन’, ‘फायटर’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसली होती. तर, दीपिकाचा पती व अभिनेता रणवीर सिंग हादेखील चर्चेत असणारा अभिनेता आहे. ‘लुटेरा’, ‘राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘बेफिकरे’, ‘गुंडे’, ‘दिल धडकने दो’, ‘पद्मावत’, ‘सिम्बा’, ‘गली बॉय’, ‘सिंघम अगेन’, अशा चित्रपटांसाठी तो ओळखला जातो. रणवीर सिंह त्याच्या उत्साहाने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. तसेच त्यांची अतरंगी कपड्यांची स्टाईल प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत असतात. आता सोशल मीडियावर या सेलिब्रिटी जोडप्याचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल भयानीने सोशल मीडियावर दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह व दीपिका पादुकोणने काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे दिसत आहे. दीपिकाने काळ्या रंगाचा फुल शर्ट-काळ्या रंगाची पँट, तसेच काळे बूट बूट घातल्याचे दिसत आहे. तर रणवीरने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून, त्यावर लांब जॅकेट घातले आहे. त्याच्या डोक्यावर काळी टोपीही दिसत आहे. त्यांचा हा लूक लक्ष वेधून घेत आहे. चाहत्यांनी यावर अनेक कमेंट्स केल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे.
काय म्हणाले नेटकरी?
नेटकऱ्यांनी दीपिका-रणवीरच्या या लूकवर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “ते कोणाला तरी किंवा बँकेला लुटण्यासाठी जात आहेत, असा लूक का केला आहे?”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “कदाचित आज मुंबईत बर्फ पडला”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “इतक्या उष्ण वातावरणात असे कपडे कसे घालू शकतात”, एका नेटकऱ्याने लिहिले, “हे कोणत्या थंड देशात चालले आहेत?”
सोशल मीडियावरील त्यांच्या या व्हिडीओवर काहींनी त्यांना राजा व राणी, असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. तसेच काहींनी त्यांना स्टायलिश जोडी, असेही म्हटले आहे. काहींनी अशी जोडी, जी चाहत्यांचे हृदय जिंकून घेण्यास कधीही चुकत नाही, असे म्हणत चाहत्यांनी या जोडीचे कौतुक केले आहे.
दीपिका अनेकदा तिच्या मुलीमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी या जोडीला एक मुलगी झाली आहे. तिचे नाव दुआ, असे ठेवण्यात आले आहे. आता अभिनेत्री कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.