करण जोहरचा लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’चे आठवे पर्व चांगलेच चर्चेत आहे. खरं तर हा शो त्याच्या पहिल्याच एपिसोडमुळे खूप गाजला. या पर्वातील पहिले पाहुण अभिनेता रणवीर सिंह व त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण होते. या एपिसोडमध्ये दीपिका पदुकोणने एक वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्यामुळे तिला खूप ट्रोल केलं गेलं. या ट्रोलिंगबद्दल दीपिकाने प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतेच दीपिका पदुकोणने ‘वोग’साठी फोटोशूट केले. ‘वोग’ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने ‘कॉफी विथ करण ८’ मधील नात्याबद्दल केलेल्या विधानानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल मत मांडलं. “जेव्हा मला एखाद्या गोष्टीबद्दल मनापासून बोलावं वाटतं तेव्हा मी स्वतःला व्यक्त करण्यापूर्वी विचार करत नाही. मी एक अशी व्यक्ती बनले आहे की मी खरं बोलण्यास किंवा माझ्या चुका मान्य करण्यास घाबरत नाही,” असं दीपिका म्हणाली.
‘या’ अभिनेत्रीने ‘रामलीला’ सोडल्याने लागलेली दीपिका पदुकोणची वर्णी, रणवीर सिंह खुलासा करत म्हणाला…
दीपिका पुढे म्हणाली, “मी सॉरी म्हणायला घाबरत नाही आणि एखाद्या खोलीत फक्त मी एकटीच वेगळा दृष्टीकोन असलेली व्यक्ती असण्याबाबत मला काही हरकत नाही.” दरम्यान, दीपिका पदुकोणला ट्रोल करण्यात आलं, त्यानंतर करण जोहरने त्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. “तुम्हाला जे करायचे आहे ते करा कारण ट्रोलिंगकडे कोणी लक्ष देत नाहीये. ट्रोलिंग करून तुम्हाला काहीच मिळणार नाहीये,” अशा शब्दांत करणने ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं होतं.
दीपिका पदुकोण काय म्हणाली होती?
“आधीच्या रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यावर मी काही काळ सिंगल राहायचं ठरवलं होतं, कारण ती नाती माझ्यासाठी खूप कठीण राहिली होती. त्यानंतर माझ्या आयुष्यात रणवीर आला, मात्र त्याने मला प्रपोज करेपर्यंत मी त्याला नात्याबद्दल कोणतीही कमिटमेंट दिली नव्हती. तेव्हा आम्ही योग्य जोडीदार शोधण्यासाठी इतरांना भेटत होतो व काही पर्याय बघत होतो. पण जेव्हा मी इतरांना भेटायचे, तेव्हा माझ्या डोक्यात सतत रणवीरचाच विचार यायचा,” असं दीपिका म्हणाली होती.