‘ओम शांती ओम’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘कॉकटेल’, ‘पठाण’, ‘जवान’, अशा चित्रपटांतून अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडणारी अभिनेत्री म्हणू्न दीपिका पादुकोण(Deepika Padukone)ची ओळख आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांना मुलगी झाली. तिचे दुआ पादुकोण सिंह, असे नाव आहे. दुआच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी रणवीर सिंह-दीपिकाची प्रमुख भूमिका असलेला सिंघम अगेन हा चित्रपट रिलीज झाला होता. दीपिका दुआच्या जन्मानंतर कोणत्याही चित्रपटात काम करीत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आता अभिनेत्रीने नुकतेच कामावर परतण्याविषयी वक्तव्य केले आहे.

माझ्या मुलीची व तिच्या आयुष्याची…

फोर्ब्सची अबु धाबीमध्ये परिषद पार पडली. त्यावेळी दीपिका म्हणाली, “मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मी आई म्हणून कोणतीही अपराधीपणाची भावना न बाळगता पुन्हा कामावर परतणे यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहे. मला विश्वास आहे की, काही कर्तृत्ववान महिला याबद्दल मला मोलाचा सल्ला देतील. पण, माझ्या मुलीची व तिच्या आयुष्याची काळजी घेणे आणि मनात अपराधीपणाची कोणतीही भावना न बाळगता, कामावर परतणे यामध्ये मी समतोल शोधत आहे.” दीपिकाने पुढे म्हटले की, इथून पुढे तिच्या मातृत्वाचा तिच्या काम आणि चित्रपट निवडीवर प्रभाव असेल. अभिनेत्री म्हणाली, “मातृत्व ही अद्भुत गोष्ट आहे. जाणीवपूर्वक नाही, तर अजाणतेपणाने इथून पुढे मी ज्या चित्रपटात काम करेन, ज्या भूमिका साकारेन त्यावर त्याचा परिणाम झालेला असेल. पण, तरीही आई होण्याआधीही मी या बाबतीत जागरूक होते, असे मला वाटते.”

दीपिकाच्या आगामी काळातील कामाबद्दल बोलायचे, तर ती दिलजीत दोसांजच्या एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसू शकते, असे म्हटले जात आहे. हा प्रोजेक्ट फराह खान कोरिओग्राफ करणार आहे. विशेष बाब म्हणजे फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, दीपिकाच्या आगामी कामाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. प्रेक्षक मात्र दीपिकाला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, दीपिका-रणवीर सिंहने काही दिवसांपूर्वीच एका लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले होते. रणवीर सिंह व दीपिका पादुकोणने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. दीपिकाने काळ्या रंगाचा फुल शर्ट-काळ्या रंगाची पँट, तसेच काळे बूट घातले होते. तर, रणवीरने काळ्या रंगाच्या कपड्यांवर, त्यावर लांब जॅकेट घातले होते. त्यांचा हा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला होता. त्यावर एका नेटकऱ्याने, “कोणाला तरी किंवा बँकेला लुटण्यासाठी जात आहेत, असा लूक का केला आहे?”, अशी कमेंट केली होती. आता अभिनेत्री मुलीच्या जन्मानंतर कोणत्या प्रोजेक्टनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader