अनेक कलाकार हे यशाच्या सर्वोच्च स्थानी असलेले दिसतात, मात्र त्यांनादेखील अपयशाचा, टीकेचा सामना करावा लागतो. अशा कलाकारांपैकी एक अभिनेत्री दीपिका पदुकोण ही आहे. एका मुलाखतीत दीपिका पदुकोणने ओम शांती ओम चित्रपटानंतर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, असा खुलासा केला आहे.
काय म्हणाली दीपिका पदुकोण?
लिव लव लाफ( Live Love Laugh) या व्याख्यान मालिकेत बोलताना अभिनेत्री दीपिका पदुकोणने पदार्पणानंतर टीकेचा सामना करावा लागला होता, असा खुलासा केला आहे. दीपिकाने म्हटले, “जेव्हा माझा पहिला चित्रपट ‘ओम शांती ओम’ प्रदर्शित झाला, त्यावेळी माझ्याबद्दल बरेच वाईट बोलले गेले. पण, एक वाईट टिप्पणी अशी होती, ज्यामुळे मी माझ्या स्वत:वर काम करण्याचे ठरवले. त्यामध्ये माझे उच्चार, शब्द, प्रतिभा आणि क्षमता यावर बोलले गेले होते. नकारात्मकता कधी कधी चांगली गोष्ट असते, ज्यामुळे तुम्ही स्वत:मध्ये चांगले बदल घडवता. जेव्हा तुमच्यावर टीका होते, त्यावेळी तुम्ही काय करता आणि ते किती सकारात्मकरित्या घेता, हे महत्वाचे आहे”, असे दीपिकाने म्हटले आहे.
याबरोबरच, स्वत:वर प्रेम असणे खूप महत्त्वाचे आहे, यावरदेखील तिने भर दिला. दीपिकाने म्हटले, “जे लोक स्वत:वर लक्ष केंद्रित करतात, त्यांच्याकडे लोक तुच्छतेने बघतात. जर एखादी व्यक्ती आठवड्याच्या शेवटी काम करायचे नाही, असे ठरवते, त्यावेळी लोकांना असे वाटते की ती तिच्या कामाप्रति प्रेरित नाही, ही गोष्ट मला फार विचित्र वाटते. चांगले काम करण्यासाठी तुम्हाला विश्रांतीची गरज असते”, असे अभिनेत्रीने म्हटले आहे.
दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे तर ती लवकरच ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात दीपिकाबरोबरच रणवीर सिंह, अजय देवगण, करिना कपूर खान, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा: आईविना मला करमत नाही…; लाडक्या सासूबाईंच्या वाढदिवशी जिनिलीयाची खास पोस्ट; म्हणाली, “थँक्यू…”
याआधी ती ‘कल्की: २८९८ एडी’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक होताना दिसले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, मृणाल ठाकूर, दिशा पटानी हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि रणवीरला मुलगी झाली आहे. ही बातमी समजताच प्रेक्षकांसह अनेक कलाकारांनीदेखील त्यांचे अभिनंदन केले होते.