शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद आणखीनच पेटला आहे. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने बराच वाद सुरू आहे. सोशल मीडियावरूनही या चित्रपटाला विरोध दर्शवण्यात येत आहे. काही राजकीय मंडळींनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आता विश्व हिंदू परिषदेने शाहरुख खाने माफी मागावी अशी मागणी केली आहे.
‘आज तक’च्या वृत्तानुसार विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांनी म्हटलं की, “माफी मागायची सोडून शाहरुख खान अहंकारी झाला आहे. भारताचा सोशल मीडिया संकुचित विचारांचा आहे. असं खानने त्याच्या कोलकातामधील भाषणामध्ये म्हटलं होतं. पण शाहरुख खानने माफी मागितली नाही तर आम्ही त्याचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.”
‘बेशरम रंग’ गाण्यासाठी भगव्या रंगाचा वापर करून या चित्रपटाने हिंदू धर्म आणि संपूर्ण भारत देशाचा अपमान केला असल्याचं सुरेंद्र जैन यांचं म्हणणं आहे. तसेच विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोदी बंसल यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली होती.
ते म्हणाले, “भगव्या रंगाला ‘बेशरम’ म्हणणं मुर्खपणाचं व आक्षेपार्ह कृत्य आहे. हिंदू विरोधी मानसिकतेच्या सगळ्या सीमा यांनी ओलांडल्या आहेत.” शाहरुखने कोलकाता चित्रपट महोत्सवामध्ये हजेरी लावत भाषण केलं. त्यामुळे ‘पठाण’चा वाद आणखीनच चिघळला असल्याचं पाहायला मिळत आहे.