बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीची अभिनेत्री झाली आहे. दीपिकाने अगदी लहान वयातच यशोगाथा लिहिण्यास सुरुवात केली आणि जगभरात प्रसिद्धी मिळवली. आता दीपिका पदुकोणने एक धक्कादायक खुलासा केला आहे. पण हा खुलासा बॉलिवूडबद्दल नसून हॉलिवूड चित्रपटसृष्टीबद्दल केला आहे. दीपिकाने हॉलिवूडमध्ये भारतीय कलाकारांवर होत असलेल्या भेदाभावाविरोधात आवाज उठवला आहे. त्यासोबतच यासंबंधीचा एक वैयक्तिक अनुभवही त्यांनी शेअर केला आहे.
हेही वाचा : स्वतः आलिया भट्ट नव्हे तर ‘ही’ व्यक्ती सांभाळते तिचे आर्थिक व्यवहार, मुलाखतीदरम्यान केला खुलासा
दीपिकाने २०१७ मध्ये अभिनेता विन डिझेलबरोबर काम करत हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ती जागतिक व्यासपीठावर आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली आहे. दीपिका सध्या पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी गेली आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान दीपिकाने हॉलिवूडच्या होणाऱ्या भेदभावांबद्दल तिचे मत मांडले आणि तेथील लोक बाहेरील देशांतील लोकांकडे कसे पाहतात हे सांगितले.
एका मुलाखतीत दीपिकाने खुलासा केला की, ती जेव्हाही अमेरिकेला जाते, तेव्हा कुठली ना कुठली गोष्ट तिच्या मनाला लागतेच. हॉलिवूड चित्रपटांमध्ये फार काम न करण्यामागे हेच मुख्य कारण आहे असेही तिने सांगितले. हॉलिवूडचा ‘XXX: Return of Xander Cage’ केल्यानंतर दीपिका पुन्हा कोणत्याच हॉलिवूड चित्रपटात दिसली नाही. याचे कारण दीपिकाने सांगितले. ती म्हणाली, “माझ्या ओळखीचा एक अभिनेता आहे, ज्याला मी व्हॅनिटी फेअर पार्टीत भेटले होते. तू खूप चांगलं इंग्रजी बोलतेस असं त्याने मला त्या वेळी सांगितलं. या वाक्याचा अर्थ मला तेव्हा समजला नाही. म्हणून मी त्याला विचारले मी, ‘याचा अर्थ काय आहे?’ त्याच्या मनात असा विचार आला होता की आपल्याला इंग्रजी येत नाही.”
दीपिकाने सांगितलेल्या या अनुभवामुळे नेटकरी तिला सोशल मीडियावर ट्रोल करू लागले आहेत. “दीपिका पदुकोण संवेदनशीलता मिळविण्यासाठी असे अनुभव सांगत आहे,” असे काही नेटकरी म्हटले. तर काही लोक याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. यासोबतच एका नेटकऱ्याने म्हटले, “दीपिका पदुकोणचे रडगाणे नेहमीच सुरू असते, कधी नैराश्यामुळे तर कधी इतर कारणांमुळे.”
आणखी वाचा : “मी आणि दीपिका लवकरच…”, रणवीर सिंगने चाहत्यांना दिले खास सरप्राईज
दरम्यान, दीपिकाच्या हाती सध्या बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट आहेत. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामध्ये ती काम करताना दिसेल. पुढील वर्षी २५ जानेवारीला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. तसेच ‘ब्रह्मास्त्र’च्या पुढील भागातही ती दिसणार असल्याचे बोलले जाते.