शाळेत असताना प्रत्येकाला विविध विषयांचं ज्ञान घेता येतं. अभ्यास करताना पुढल्या वर्गात जाण्यासाठी वर्षाच्या शेवटी एक परीक्षाही घेतली जाते. अनेक विद्यार्थ्यांना दरवर्षी होणाऱ्या परीक्षांचा मोठा ताण येतो. विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘परीक्षा पे चर्चा २०२५’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सोमवारी या कार्यक्रमाचा पहिला भाग झाला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा आणि त्यामुळे येणाऱ्या तणापासून स्वत:ला वाचवण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती सांगितली. त्यानंतर आता पुढील भागात बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमाच्या पुढील भागाचा एक व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका विद्यार्थ्यांना तिच्या शाळेतील आठवणी सांगत आहे.
दीपिका गणितात कच्ची
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दीपिकाचं सुरुवातीला स्वागत केलं जातं. त्यानंतर ती म्हणते, “मी खूप अगाऊ मुलगी होते. सोफा, टेबलवर चढून उड्या मारायचे. मी गणितात खूप कच्ची होते आणि आजही आहे.” व्हिडीओमध्ये दीपिका विद्यार्थ्यांना पुढे सांगत आहे, “जसं नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘एक्साम वॉरियर्स’ पुस्तकात लिहिलं आहे, ‘एक्सप्रेस नेव्हर सप्रेस’, त्यामुळे नेहमी तुम्हाला जे वाटतं ते आई-बाबा, मित्र यांना सांगा”, असं दीपिका यात सांगत आहे.
दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. “‘परीक्षा पे चर्चा’ आठव्या आवृत्तीसह परतला आहे! यावेळी आपण मानसिक आरोग्याच्या महत्त्वावरही चर्चा करणार आहोत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यासाठी केलेल्या वचनबद्धतेबद्दल धन्यवाद. मी आमचा पुढील एपिसोड पाहण्यासाठी फार उत्सुक आहे”, असं दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
कार्यक्रम केव्हा आणि कुठे पाहता येणार?
‘परीक्षा पे चर्चा २०२५’ कार्यक्रम शिक्षा मंत्रालयचे यूट्यूब चॅनेल, पीएम मोदी यांचे यूट्यूब चॅनेल, दूरदर्शन आणि रेडियो चॅनेल – ऑल इंडिया रेडियो, ऑल इंडिया रेडियो एफएम चॅनेलवर दिसणार आहे. ‘परीक्षा पे चर्चा २०२५’ कार्यक्रमाचा दुसरा एपिसोड १२ फेब्रुवारी सकाळी १० वाजता प्रदर्शित होईल. दीपिका पादुकोण या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर मार्गदर्शन करणार आहे.