दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर दीपिका-रणवीरने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. रणवीर-दीपिकाच्या लग्नात डिझाईनर म्हणून सब्यसाची मुखर्जीने जबाबदारी सांभाळली होती. २०१९ मध्ये दीपिकाने सब्यसाचीसह ‘बिझनेस ऑफ फॅशन’ला मुलाखत दिली होती. या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रणवीर-दीपिकाचा शाही विवाहसोहळा इटलीतील लेक कोमो येथील विला डेल बाल्बियानेलो येथे संपन्न झाला होता. दोघांचेही लग्न अत्यंत खासगी पद्धतीत आणि निवडक कुटुंबीयांच्या उपस्थित झाले. अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल सांगताना २०१९ च्या मुलाखतीत सब्यसाची म्हणाला होता, “दीपिका-रणवीरच्या लग्नात मी जेवण जेवलो तशा जेवणाचा मी आजवर आस्वाद घेतलेला नाही. प्रत्येक पदार्थ अतिशय सुंदर होता. तिच्या लग्नात सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. यासाठी दीपिकाचे कौतुक करावे लागेल.”
सब्यसाची पुढे म्हणाला, “दीपिका आणि रणवीरने संपूर्ण मेन्यूची एक-दोन नव्हे तर तब्बल १२ वेळा चव ( फूट टेस्टिंग) घेतली होती.” यावर दीपिका म्हणाली, “हो खरंय, लग्नातील जेवणाचा मेन्यू ठरवायच्या आधी मी तब्बल १२ वेळा जेवणाची चव घेतली होती.” पुढे, सब्यसाची म्हणाला, “दोघांच्या लग्नाला खूपच निवडक लोकं उपस्थित होती आणि दीपिकाच्या घरच्यांनी सर्वांची उत्तम सोय केली होती. त्यांच्या लग्नात प्रत्येकाची विचारपूस करण्यात आली. प्रत्येकाने अशाचप्रकारे विवाहसोहळा आयोजित करावा असे मला वाटते.”
“जेव्हा मॉडेलिंग क्षेत्रात प्रवास सुरु केला तेव्हाच मी ठरवले होते की, लग्नाच्यावेळी सब्यसाचीने डिझाईन केलेला लेहेंगा परिधान करेन. आता माझ्या प्रत्येक समारंभातील कपडे सब्यसाची डिझाईन करतो” असे दीपिकाने या जुन्या मुलाखतीत सांगितले आहे.