सध्या जगभरात फिफा विश्वचषकाची चर्चा सुरू आहे. यंदा कतारमध्ये फिफा विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे. १८ डिसेंबरला फिफा विश्वचषक २०२२चा अंतिम सामना होणार आहे आणि या अंतिम सामन्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण हजेरी लावणार आहे. विशेष म्हणजे फिफा विश्वचषक २०२२ मध्ये दीपिका पदुकोणकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. असा सन्मान मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे.
दीपिका पदुकोणच्या हस्ते अंतिम सामन्याच्या ट्रॉफीचं अनावरण होणार आहे. याचबरोबर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या ट्रॉफीचं अनावरण करण्यासाठी निवड करण्यात आलेली दीपिका पदुकोण पहिली ग्लोबल स्टार ठरणार आहे. दीपिका पदुकोण आता फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाली आहे. तिने हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. आता फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी ती कतारला जाणार आहे. असा सन्मान मिळालेली ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे.
आणखी वाचा- Video: अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा, ‘जय हिंद’ म्हणताच…
अर्थात याबाबत दीपिका पदुकोणकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यासाठी दीपिका पदुकोणच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यासाठी १८ डिसेंबरच्या अगोदर ती कतारसाठी रवाना होईल. याआधी फिफा विश्वचषकाच्या एका कार्यक्रमात अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीनेही परफॉर्म केलं होतं.
दरम्यान ग्लोबल स्टार झालेल्या दीपिका पदुकोणच्या सन्मानात दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. अलिकडेच तिने स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. त्याआधी तिला कान्स फेस्टिव्हलमध्ये ज्युरी म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. त्याशिवाय गोल्ड ब्यूटीच्या सरासरीनुसार जगातील सर्वात सुंदर दिसणाऱ्या पहिल्या १० अभिनेत्रींमध्ये दीपिकाच्या नावाचा समावेश आहे. आता फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफीच्या अनावरणासाठी तिची निवड करण्यात आल्याने तिच्या ग्लोबल अचिव्हमेंटमध्ये आणखी भर पडली आहे.