बॉलीवूडमधील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी शनिवारी अभिनेत्री आणि मंडीची खासदार कंगना रणौतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. कंगना रणौत न्यायालयात गैरहजर राहिल्याप्रकरणी जावेद अख्तर यांनी हा अर्ज केला आहे.
शनिवारी कंगना रणौतला न्यायालायात हजर राहणे बंधनकारक होते; मात्र ती हजर राहिली नाही. कंगनाने याआधी न्यायालयात हजर राहण्यापासून कायमची सवलत मागितली होती. ही बाब जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. महत्त्वाचे म्हणजे कंगनाची ही मागणी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयानेदेखील नाकारली होती. १ मार्च २०२१ ला कंगना रणौतविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कंगना रणौतने न्यायालयात हजेरी लावल्याने ते जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले. अभिनेत्रीने न्यायालयीन कामकाजात विलंब करण्याचा प्रयत्न केला असून, अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे जावेद अख्तर यांच्या वकिलाने म्हटले आहे.
मात्र, न्यायालयाने जावेद अख्तर यांनी मागणी केलेल्या अर्जाला स्थगिती देत, कंगना रणौतला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अभिनेत्रीच्या वकिलांद्वारे ती ९ सप्टेंबर २०२४ ला न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
२०१६ मध्ये जावेद अख्तर यांच्या राहत्या घरी झालेल्या एका बैठकीवरून हा वाद सुरू आहे. हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यामध्ये काही ई-मेल एकमेकांना पाठविल्यावरून वाद सुरू होता. या बैठकीदरम्यान अख्तर यांनी हृतिक रोशन यांची माफी मागायला सांगितल्याचे कंगनाने म्हटले होते. २०२१ मध्ये एका मुलाखतीत कंगनाने म्हटले होते की, २०१६ मध्ये झालेली बैठक त्यांना अपमानजनक वाटली. त्यामुळेच त्यांनी तिच्याविरुद्ध मानहानीचा दावा करीत न्यायालयात धाव घेतली आहे. कंगना रणौतनेदेखील जावेद अख्तर यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र, अख्तर यांच्यावरील कारवाईला दिंडोशी सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती.
फेब्रुवारीमध्ये कंगनाने जावेद अख्तर यांनी तिच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्याबरोबरच अख्तर यांनी कंगनाविरुद्ध दाखल केलेला खटला आणि तिचा अख्तरविरुद्धचा खटला यांचा एकमेकांशी संबंध असून, त्यांची एकत्र सुनावणी व्हावी, अशी मागणी कंगनाने केली होती.
दरम्यान, कंगनाने २०२० ला एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये तिने जावेद अख्तर यांच्या २०१६ साली झालेल्या बैठकीचा उल्लेख केला आणि जावेद अख्तर व तिच्यामधील वादाबद्दलदेखील तिने वक्तव्य केले होते. त्यानंतर जावेद अख्तर यांनी अभिनेत्रीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. आता हे प्रकरण कोणते वळण घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.