शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुखने प्रेक्षकांना वेड लावलं. चित्रटपटाने जगभरात एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवला. अशातच त्याचे आणखी दोन चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ‘डंकी’ व ‘जवान’चा समावेश आहे. ‘जवान’ चित्रपटातील काही सीन्स प्रदर्शनाच्या आधीच लीक झाले होते. या प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
‘पठाण’च्या यशानंतर शाहरुख खानचे चाहते त्याचा आगामी ‘जवान’ चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहेत, पण ट्रेलर अजून यायचा आहे, मात्र त्याआधीच सोशल मीडियावर दोन व्हिडीओ व्हायरल झाले होते. ते चित्रपटाच्या सेटवर शूटिंगदरम्यानचे होते. हे व्हिडीओ लीक झाले होते, त्यानंतर शाहरुख आणि गौरी खानची प्रोडक्शन कंपनी ‘रेड चिलीज’ने कोर्टात धाव घेतली होती. आता कोर्टाने या प्रकरणी एक आदेश दिला आहे, ज्यामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ‘जवान’च्या लीक झालेल्या क्लिप हटवण्यास सांगण्यात आले आहे.
पहिल्या क्लिपमध्ये शाहरुख फाइट करताना दिसत होता. तर, दुसरी क्लिप डान्स सीक्वेन्सची होती, ज्यामध्ये शाहरुख खान आणि चित्रपटाची मुख्य अभिनेत्री नयनतारा दिसत होते. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी वेबसाइट्स, केबल टीव्ही प्लॅटफॉर्म, डायरेक्ट टू होम सेवा तसेच ‘जॉन डो’ प्रतिवादींना ‘जवान’च्या कॉपीराइटचे उल्लंघन करण्यापासून रोखले आहे. शाहरुख आणि गौरी खानच्या प्रॉडक्शन हाऊस ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ ने खटला दाखल केल्यानंतर न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी हा आदेश दिला.
न्यायालयाने आपल्या आदेशात यूट्यूब, गुगल, ट्विटर आणि रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ‘जवान’ चित्रपटाच्या कॉपीराइट असलेल्या कंटेंटचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सांगितलं आहे. न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी अनेक इंटरनेट सेवा प्रदात्यांना चित्रपटाशी संबंधित कंटेंट ब्लॉक करण्यास सांगितलंय. दरम्यान, शाहरुख व नयनताराची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.