महानायक अमिताभ बच्चन यांची नात व अभिषेक-ऐश्वर्याची लेक आराध्याबाबत खोटी बातमी देण्यात आली होती. फेक न्यूज पसरवणाऱ्या युट्यूब चॅनलविरोधात बच्चन कुटुंबाने कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. आज बच्चन कुटुंबाच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर कोर्टाने युट्यूब चॅनलला महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
बच्चन कुटुंबाच्या याचिकेत काय म्हटलं होतं?
कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत बच्चन कुटुंबाने म्हटलं होतं की ज्या युट्यूब चॅनलने आराध्याबाबत खोटी बातमी दिली आहे त्यांच्या विरोधात कारवाई केली जावी. तसंच ही व्हायरल होणारी बातमी व कंटेंट थांबवला जावा. आराध्या अल्पवयीन असल्याने तिच्याबद्दल खोटी माहिती या चॅनलने पसरवू नये. काही बातम्यांमध्ये आराध्याचं निधन झाल्याचंही म्हटलं होतं.
कोर्टाचे आदेश काय?
दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश सी हरीशंकर यांच्या समोर आज २० एप्रिलला या याचिकेवर सुनावणी पार पडली. दिल्ली उच्च न्यायालयाने संबंधित यूट्यूब चॅनलला आराध्याबद्दलच्या आक्षेपार्ह कंटेंटवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. एवढेच नाही तर कोर्टाने काहींना समन्सही पाठवले आहेत. अशा प्रकारचा मजकूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तत्काळ हटवून तो तत्काळ ब्लॉक करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच आराध्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबद्दल खोटे दावे करणारे सर्व व्हिडीओ व मजकूर हटवण्यासही सांगितलं आहे.