देव आनंद! हे नाव घेतलं की आपल्या समोर येतो तो खास पद्धतीने मान तिरकी करुन एका विशिष्ट हावभावात वावरणारा हिंदी सिनेसृष्टीतला पहिला चॉकलेट हिरो. देवानंद यांची आज १०१ वी जयंती. त्याने हिंदी सिनेसृष्टीतला एक मोठा काळ गाजवला. ग्रेगरी पेक या हॉलिवूडच्या अभिनेत्याचा त्याच्यावर प्रचंड प्रभाव. डोक्यावर हॅट, शर्ट इन करणं, स्कार्फ घालणं हे सगळं देव आनंद यांनी खास पद्धतीने आत्मसात केलं आणि स्वतःची एक स्टाईल तयार केली. या स्टाइलवर एक- दोन नाही तर तीन पिढ्या फिदा होत्या. ‘मॅकन्नाज गोल्ड’ मधला ग्रेगरी पेक बघितला की, हमखास देव आनंद यांची आठवण होते. देव आनंद यांचं आयुष्य मोठं कमालीचं होतं. सुपरस्टार असूनही त्याच्यात विनय आणि आदर ठायी ठायी भरलेला होता. ज्येष्ठता आल्यानंतरही ‘देवसाहब’ हा उल्लेख त्याला कधी आवडलाच नाही.

अभिनेता होण्याचं स्वप्न बाळगून मुंबईत आलेला तरुण देव

देव आनंद यांच्याबाबत लेखिका अल्पना चौधरी सांगतात, १९४३ मध्ये धर्मदेव आनंद नावाचा तरुण पदवीधर लाहोरहून प्रदीर्घ प्रवास करुन मुंबईत उतरला आणि मुंबईचाच झाला. कारण बघता क्षणी त्याला हे शहर आवडलं. अभिनेता व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगून हा तरुण मुंबईत आला, त्यावेळी पाऊस पडत होता, धर्मदेव याचा ‘द देव आनंद’ झाला तरीही तो हा पाऊस आणि मुंबई कधीच विसरला नाही. मुंबईत येण्याचा अनुभव हाच देव आनंदसाठी त्याला चकीत करणारा ठरला. भाऊ चेतन आनंदच्या मित्राच्या घरी राहण्याची व्यवस्था झाली. त्यानंतर देव आनंद यांनी थेट गाठलं ते अशोक कुमार यांचं किस्मत थिएटर. मुंबईत काही दिवस गेल्यानंतर तो काम मागू लागला. परळच्या किंग एडवर्ड मेमोरिअल रुग्णालयासमोर म्हणजेच केईएम रुग्णालयासमोर देव आनंद एका चाळीत राहू लागला. एका वकिलाचा मुलगा, लाहोरच्या ख्यातनाम महाविद्यालयाचा पदवीधर पण अभिनेता होण्याचं स्वप्न त्याच्या उराशी होतं त्यामुळे चाळीत राहण्यात त्याला कुठलाच कमीपणा वाटला नाही. देव आनंद यांनी त्या काळात मुंबई शहर बस आणि ट्रामच्या माध्यमातून पालथं घातलं. मुंबईचा वेग आणि हार न मानण्याचा गुण देव आनंद यांनी अंगिकारला तो कायमचाच. पुण्यातल्या प्रभात स्टुडिओने देव आनंद यांची गुणवत्ता हेरली आणि अभिनेता म्हणून तीन वर्षांचा करार केला. अशा पद्धतीने देव आनंद यांना हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश मिळाला आणि हिंदी सिनेसृष्टीला देव आनंद मिळाला!

गुरुदत्त आणि देव आनंद यांची खास मैत्री

देव आनंद मुंबईत परतले आणि ‘४१ पाली हिल, वांद्रे’ इथे भावाबरोबर राहू लागले. तोवर भाऊही मुंबईत स्थायिक झाला होता. या खेपेस गुरुदत्त या महत्त्वाकांक्षी दिग्दर्शकाच्या साथीने त्यांनी मुंबईचा कानोसा घेतला. मुंबईच्या बेस्ट बसेस आणि लोकलमधून देव आनंद मुंबईचा कानाकोपरा धुंडाळत. मुंबईत मोजक्याच ठिकाणी हॉलिवूडचे चित्रपट लागत. देव आनंद त्या चित्रपटांचा आस्वाद घेत. ते सांगायचे, ‘गुरु आणि मी शहरभर फिरायचो, मग चित्रपट पाहायचो आणि कॉफी पिऊन घरी परतायचो. काहीवेळेला आम्ही पाली हिलवरच्या गोल्फ लिंक्स या ठिकाणी जायचो. तो परिसर सुंदर आणि शांत असा होता. मी मुंबईचे रस्ते, गल्ल्या हिंडलो आहे, अक्षरक्ष: कोळून प्यायलो आहे. हे शहर माझ्या धमन्यांमध्ये साठलं आहे. हे शहर माझ्यात कणाकणाने वाढतं आहे. तुम्ही कामापरत्वे जगात कुठेही जा. तुम्हाला हे शहर परत बोलावतं. खुणावतं’. मुंबईविषयी बोलताना देव आनंद यांच्या डोळ्यात वेगळीच चमक जाणवायची.

स्वप्नगरीत दाखल झालेला तो तरुण स्टार कसा झाला याची कहाणी अनोखी आहे. देव आनंद सांगतात, ‘एकेदिवशी मी लोकल ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर आलो. कोणीतरी मला आतून हाक मारली. दिग्दर्शक शाहीद लतीफ आणि त्यांचे लेखक इस्मत चुगतई तेच मला बोलावत होते. माझ्या पुढच्या चित्रपटात बॉम्बे टॉकीजसाठी काम करशील का असं लतीफ यांनी विचारलं. मी त्वरित होकार भरला’. लोकल ट्रेनमध्ये एका होतकरु तरुणाला काम मिळणं हे मुंबईच्या श्रमिक संस्कृतीचं द्योतकच म्हणायला हवं. मुंबई याच खुल्या आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनासाठी ओळखली जाते.

उत्साहाने मुसमुसलेल्या स्थितीत देव आनंद यांनी मालाडला जाणारी लोकल पकडली. तिथे उतरून बॉम्बे टॉकीजला जायला टांगा घेतला. तिथे पोहोचून त्यांनी ‘जिद्दी’ या चित्रपटासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली. ते वर्ष होतं १९४८. चित्रपटात पदार्पण आणि हळूहळू स्थिरावल्यानंतर देव आनंद यांनी जुहूत घरासाठी जमीन घेतली. शेवटपर्यंत ते तिथेच राहिले.

मुंबईवर देव आनंद यांचं विशेष प्रेम

देव आनंद यांची लोकप्रियता वाढू लागली तसं त्यांचं शहराविषयचं प्रेमही बहरतच गेलं. त्यांच्या चित्रपटात मुंबई हमखास दिसायची. १९५४ साली प्रदर्शित झालेल्या टॅक्सी ड्रायव्हर चित्रपटात मुंबई शहराचा उल्लेख क्रेडिट्समध्ये आवर्जून दिसतो. चित्रपटातली मध्यवर्ती भूमिका साकारताना देव आनंद मरिन ड्राईव्हवरुन गाडी घेऊन जाताना दिसतात. दक्षिण मुंबईतल्या आर्ट डेको धाटणीच्या वास्तूंना साक्षी ठेऊन जाताना दिसतात. कधी ते गेटवे ऑफ इंडियासमोर दिसतात तर कधी वरळी सीफेसला लाटांचं तांडव पाहताना दिसतात. कधी जुहू किनाऱ्यावरच्या झाडांच्या छायेत दिसतात. दिग्दर्शक व्ही. रात्रा यांनी कृष्णधवल रंगात मुंबईच्या बहुढंगी छटा सुरेखपणे टिपल्या आहेत. ‘देव आनंद-डॅशिंग देबनॉर’ या पुस्तकात अल्पना चौधरी यांनी हा उल्लेख केला आहे.

देव आनंद यांची आज १०१ वी जयंती आहे, त्यांच्या चित्रपटांची जादू अजूनही कायम आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

दातातली फट आणि दिग्दर्शकाने ठेवलेली अट

देव आनंद जेव्हा सिनेमाची ऑडिशन देण्यासाठी पुण्याला गेले तेव्हा त्यांच्यापुढे एक अट ठेवण्यात आली. देव आनंद यांनी त्यांच्या पुस्तकात हा उल्लेख केला आहे. देव आनंद म्हणाले, मला तेव्हा सांगण्यात आलं तुझ्या दातांमध्ये फट आहे. त्यात फिलर भरुन ती बंद करावी लागेल. दातांमध्ये फट असल्याने मी फिलर भरुन शूटिंग करु लागलो. पण मग मी नैसर्गिक अभिनय करु शकलो नाही. मी विनंती केली की हे फिलर हटवू का? त्यावर मला हो असं उत्तर मिळालं. मला माझ्या दातातल्या गॅपसह लोकांनी स्वीकारलं याचा मला आनंद आहे.

देव आनंद आणि काळ्या शर्टचा किस्सा

देव आनंद यांच्या बाझी, टॅक्सी ड्रायव्हर, गँब्लर, गाइड या सिनेमांची जादू आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. तसंच देव आनंद यांची स्टाईलही लोकांना भावली. थोडी तिरकी मान, डोक्यावर खास टोपी, गळ्यात स्कार्फ हे घालून पॉज न घेता संवाद म्हणणाऱ्या देव आनंद यांनी रसिकांवर मोहिनी घातली. सिनेमात मला लांबलचक संवाद मिळायाचे, मी एका श्वासात ते बोलू की थोडा पॉज घेऊन बोलू याचं मनात द्वंद्व सुरु असायचं. मी एका श्वासात संवाद म्हणू लागलो आणि ती माझी स्टाईल झाली असं देव आनंद यांनी सांगितलं होतं. देव आनंद यांची स्टाईल कॉपी होऊ लागली. त्यांच्याबाबत असंही सांगितलं जातं की, काळा शर्ट घालणं त्यांनी बंद केलं होतं. काही जणांचं असं म्हणणं होतं की काळा शर्ट घालून देव आनंद बाहेर पडले की, त्यांना पाहून मुलींची शुद्ध हरपते. देव आनंद यांनी ही अफवा होती असं म्हटलं होतं. काला पानी या सिनेमापासून काळे कपडे वापरू लागलो असंही देव आनंद म्हणाले होते.

देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतले स्टाईल आयकॉन होते (फोटो-लोकसत्ता)

रिस्क घेणारे देव आनंद

सर्जनशील माणूस हा जोखीम पत्करणारा असतो. देव आनंद यांच्यातही हा गुण दिसून येतो. हिंदी सिनेमातला व्हिजनरी माणूस असंही त्यांना म्हटलं जातं. १९४३ मध्ये देव आनंद मुंबईत आले होते. पण पुढे त्यांनी केलेली प्रगती इतकी होती की १९४९ मध्ये त्यांनी वन केतन फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती केली.

गाईड या सिनेमात देव आनंद यांनी चक्क ग्रे शेड असलेली भूमिका केली. त्यावेळी असं पाऊल उचलणं ही जोखीमच होती. पण गाईडला मिळालेलं यश ही त्यांनी घेतलेली जोखीम किती अस्सल होती आणि त्याचं फळ त्यांना कसं मिळालं हे दाखवणारी ठरली. गाईड हा देव आनंद यांचा सिनेमा सिनेसृष्टीतला माईलस्टोन समजला जातो.

हे पण वाचा- Dev Anand‘s Guide: हॉलिवुडमध्ये झळकलेल्या देव आनंदच्या गाईड चित्रपटाची गोष्ट! |गोष्ट पडद्यामागची-७६

सुरैय्या आणि देव आनंद यांचं प्रेम

देव आनंद यांचं फिल्मी आयुष्य जसं सुंदर होतं तसंच त्यांचं व्यक्तिगत आयुष्यही चर्चेत राहिलं. अभिनेत्री सुरैय्या आणि देव आनंद यांचं प्रेम होतं. पण सुरैय्यांचा धर्म वेगळा होता त्यामुळे या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. सुरैय्या या शेवटपर्यंत एकट्याच राहिल्या. ‘माय देव मेमरीज ऑफ अॅन इममॉर्टल मॅन’ हे पुस्तक अली पीटर जॉन यांनी लिहिलं आहे. यात ते म्हणतात देव मला म्हणायचा की, ‘काश हमारी कहानी का अंत कुछ और होता..’ मै जिंदगी का साथ निभाता चला गया या ओळीप्रमाणे देव आनंद आयुष्यात पुढे गेले. त्यांनी कल्पना कार्तिकशी विवाह केला.

एक खास आयुष्य जगलेल्या देव आनंद या अभिनेत्याने त्याचं आयुष्य एखाद्या सतारीसारखं किंवा एखाद्या रागदारीसारखं जगलं होतं. देव आनंद, दिलीप कुमार आणि राज कपूर ही त्रिमूर्ती त्या काळात सिनेसृष्टीवर राज्य करत होती. देव आनंद यांचा स्टायलिश अंदाज मात्र आजही चर्चिला जातो, यात काहीही शंका नाही. त्यामुळे देव आनंद यांच्या बाबत असंच म्हणावंसं वाटतं की या सम हाच!