देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील देखणे नायक होते. त्यांच्या तेव्हा अनेक चाहत्या असतानाही देव आनंद फक्त एका व्यक्तीवर म्हणजे सुरैया यांच्यावर प्रेम करीत होते. सुरैया त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. देव आणि सुरैया यांची पहिली भेट १९४८ मध्ये ‘विद्या’ चित्रपटाच्या सेटवर झाली. देव आनंद पहिल्याच भेटीत सुरैया यांच्या प्रेमात पडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक कलाकारांमध्ये चित्रपटाच्या सेटवर प्रेम फुलते आणि त्यातूनच पुढे ते एकमेकांचे आयुष्यभराचे जोडीदार होतात. परंतु, देव आनंद (Dev anand) आणि सुरैया (suraiya) यांची प्रेमकहाणी मात्र याला अपवाद ठरली. त्यांच्या प्रेमात धर्माच्या भिंती उभ्या राहिल्या आणि त्यामुळे त्यांचे प्रेम कधीच पूर्णत्वास जाऊ शकले नाही. सुरैया यांच्या आजीला देव आनंद यांच्यासारखा हिंदू नायक मान्य नव्हता. त्यांच्या विरोधामुळे हे प्रेम अधुरेच राहिले.

हेही वाचा…विद्या बालनने ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाला ‘या’ कारणामुळे दिलेला नकार, निर्मात्यांनी केला खुलासा

धर्माच्या बंधनात अडकलेले प्रेम

सुरैया त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांना ‘मलिका-ए-हुस्न’, ‘मलिका-ए-तरन्नुम’ व ‘मलिका-ए-अदाकारी’ असे अनेक मानाचे गौरव मिळाले होते. देव आनंद यांच्याबरोबर त्यांचे प्रेम जडले; पण त्यांना एकमेकांचा सहवास कधीच मिळू शकला नाही. सुरैया यांच्या आजीने या प्रेमाला विरोध केला आणि सुरैया यांना देव आनंद यांच्यापासून दूर राहण्याची सक्त ताकीद देण्यात आली. एवढेच नव्हे, तर देव आनंद यांनी त्यांना दिलेली अंगठीदेखील त्यांच्या आजीने समुद्रात फेकली होती. हे प्रेम धर्माच्या बंधनात अडकून राहिले.

देव आनंद यांचे पहिले प्रेम

असं बोललं जात की, त्या काळात देव आनंद इतके देखणे मानले जात की, त्यांना काळे कपडे घालण्यास मनाई होती. कारण- मुली त्यांना काळ्या कपड्यांत पाहून बेशुद्ध होत असत. अनेक चाहत्या देव आनंद यांच्यावर फिदा होत्या; मात्र देव आनंद यांचे सुरैया यांच्यावर प्रेम होते. ‘न्यूज १८ हिंदीने’ दिलेल्या वृत्तानुसार १९५० मध्ये ‘अफसर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान देव आनंद यांनी पुन्हा एकदा सुरैया यांना प्रपोज केले; परंतु सुरैया यांनी भीतीपोटी नकार दिला. सुरैया यांनी नकार देण्यामागचे कारण म्हणजे त्यांना मिळालेली धमकी. “सुरैया या देव आनंद यांच्याबरोबर राहिल्यास त्याचे देव आनंद यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी त्यांना मिळाली होती.

हेही वाचा…बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान सलमान खान परदेशात करणार शो; चाहते म्हणाले, “भाईजान वाघासारखा…”

सुरैया यांची एकाकी जीवनयात्रा

सुरैया या देव आनंद यांच्याबरोबर लग्न करू शकल्या नाहीत. पण, त्यांनी आयुष्यभर कधीच विवाहही केला नाही. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्या एकट्याच राहिल्या. एका मुलाखतीत सुरैया यांनी म्हटले होते, “मी कदाचित भित्री होते. म्हणूनच मी देव आनंद यांना होकार देऊ शकले नाही.” या निर्णयाची खंत त्यांना शेवटपर्यंत होती. २००४ मध्ये ७४ वर्षांच्या वयात सुरैया यांनी या जगाचा निरोप घेतला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dev anand and suraiya unfulfilled tragic love story psg