‘जय मल्हार’ या मालिकेतून सर्वांच्या घराघरात पोहोचलेल्या अभिनेता देवदत्त नागे याने मराठी मनोरंजन सृष्टीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला होता. तर आता या चित्रपटाच्या मानधनाबाबत त्याने एक मोठं वक्तव्य केलं आहे.
या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याचं कळताच त्याचे चाहते खूप खूश झाले होते. आता या चित्रपटाबाबत नवनवीन माहिती समोर यायला सुरुवात झाली आहे. देवदत्तने नुकतीच ‘महाराष्ट्र टाइम्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली याबद्दल तो खूप खूश असून स्वतःला भाग्यवान समजतो, असं तो म्हणाला.
देवदत्तने सांगितलं, “हा चित्रपट आणि ही भूमिका हेच माझ्यासाठी मानधन आहे… प्रसिद्धीच्या पलीकडचं आहे. ज्या शरीरयष्टीमुळे मला ओळखलं जातं; त्याचं सगळं श्रेय मारुतीरायाचं आहे. मी गेली २५ वर्षं व्यायाम करतोय आणि मारुतीरायाच त्यामागची प्रेरणा आहे. लहानपणापासून प्रभू श्रीरामांचं आणि मारुतीरायाचं स्मरण करून माझ्या दिवसाची सुरुवात होते. त्यामुळे या चित्रपटात मला हनुमानाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो.” देवदत्तचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे.
गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र या टीझरमध्ये दाखवल्या गेलेल्या दृश्यांवर जोरदार टीका झाली आणि अखेर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दृश्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. अनेक बदल केल्यानंतर आता हा चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.