कंगना रणौत दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC/ सेन्सॉर बोर्डाकडून ) प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाला विलंब झाला होता. चित्रपटातील काही दृश्यावर आक्षेप घेतले गेल्यामुळे अनेक काळापासून हा चित्रपट रखडला होता. अखेर सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिल्यावर संपूर्ण देशभरात चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. कंगनाने या सिनेमाच्या स्पेशल शोचं आयोजन केलं होतं. या शोला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती.

चित्रपट पाहिल्यावर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, “इमर्जन्सी’ या चित्रपटाचा स्पेशल शो मी पाहिला. ‘इमर्जन्सी’ हा आपल्या देशाच्या इतिहासातील असा एक अध्याय आहे ज्यामुळे अनेक नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं होतं. भारताच्या संविधानाचं पालन केलं गेलं नाही, लाखो नेते दोन वर्षांहून अधिक काळ कारागृहात होते. ज्याप्रकारे त्या काळात जनतेवर अत्याचार झाला होता, या सगळ्या गोष्टी चित्रपटात प्रभावीपणे मांडल्या आहेत. याशिवाय कंगना यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. मी त्यांना यासाठी खूप शुभेच्छा देतो.”

हेही वाचा : “१२ महिन्यांमध्ये १२ मराठी चित्रपट प्रदर्शित करणार”,‘अलबत्या गलबत्या’ नाटकातील अभिनेता सनीभूषण मुणगेकर याचा संकल्प

“या चित्रपटात केवळ आणीबाणीची गोष्ट नसून त्याआधी झालेल्या १९७१ मधल्या युद्धाची कहाणी देखील प्रेक्षकांना पाहायला मिळते. त्यांचा जीवनप्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या देशात लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी जो इतिहास शिकवला पाहिजे, तो इतिहास या चित्रपटात पाहायला मिळत आहे.” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कंगना यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाली, “चित्रपटाचा हा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूप आव्हानात्मक होता. आज मुख्यमंत्र्यांनी आमचा चित्रपट पाहिला आणि त्यांनी कौतुक आणि प्रोत्साहनाचे शब्द आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि हा आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे.”

कंगना रणौतने या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील केलं आहे. ‘इमर्जन्सी’मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर, अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदे, पुपुल जयकर यांच्या भूमिकेत महिमा चौधरी, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत अभिनेता मिलिंद सोमण तर, संजय गांधी यांची भूमिका अभिनेता विशाख नायरने साकारली आहे.

Story img Loader