सारा अली खानच्या ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. हा चित्रपट उषा मेहता यांचा बायोपिक असून यामध्ये सारा अली खान प्रमुख भूमिका साकारत आहे. २१ मार्चला हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘देवयानी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या संग्राम साळवीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
सारा अली खानसह खास फोटो शेअर करत संग्रामने ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. सध्या मराठी कलाविश्वातून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. संग्रामने सारासह एक फोटो शेअर करत “आमचा चित्रपट नक्की बघा” असं आवाहन त्याच्या चाहत्यांना केलं आहे.
संग्राम साळवीच्या पोस्टवर सिद्धार्थ बोडके, नम्रता संभेराव, सुयश टिळक, संग्राम समेळ या कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय त्याची पत्नी अभिनेत्री खुशबू तावडेने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत “मला तुझा अभिमान आहे” असं म्हटलं आहे.
दरम्यान, संग्राम साळवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘देवयानी’ मालिकेमुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. यानंतर अभिनेत्याने ‘मितवा’, ‘शेर शिवराज’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.